मिरज : मिरजेत विधानसभेच्या निवडणुकीवरुन भाजपचे पालकमंत्री सुरेश खाडे व राष्ट्रवादीचे मागील निवडणुकीतील उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी नेते बाळासाहेब होनमोरे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी मिरजेत निदर्शने केली. होनमोरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारत निदर्शने करण्यात आली.चार दिवसांपूर्वी पालकमंत्री खाडे यांनी विरोधकांचा समाचार घेताना, इच्छुकांचा फुगा दरवेळी फुगवला जातो, मात्र तो निवडणुकीत फुटतो अशी टीका केली. त्यास प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे यांची जीभ घसरली. निवडणुकीत चड्डी काढली जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले होते.त्यामुळे संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री कार्यालयासमोर बाळासाहेब होनमोरे यांच्याविरोधात निदर्शने केली. आंदोलनात धनंजय कुलकर्णी, ज्योती कांबळे, रुपाली गाडवे, शशिकांत वाघमोडे, जयगोंड कोरे, किरण बंडगर, सुमित ठाणेदार, राज कबाडे, विक्रांत पाटील आणि मयूर नायकवडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.
मिरजेत भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रंगली जुगलबंदी, पालकमंत्र्यांवरील आरोपानंतर भाजपकडून पुतळा दहन
By अविनाश कोळी | Published: December 12, 2023 6:43 PM