कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांत व कोरोनाग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांत भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना बेड मिळवून देणे, ऑक्सिजनची व्यवस्था करणे, उपचारासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, हातावर पोट असलेल्या गरिबांच्या उदरनिर्वाहाची सोय करणे या वेगवेगळ्या स्वरूपात मदतीच्या नियोजनासाठी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप पदाधिकाऱ्यांची व्हर्चुअल बैठक पार पडली. बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, महापालिका नेते शेखर इनामदार, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, मोहन वाटवे, डॉ. भालचंद्र साठ्ये, शाहनवाज सौदागर, अश्रफ वांकर यांच्यासह मंडल अध्यक्ष, नगरसेवक व पदाधिकारी सहभागी होते.
दीपक शिंदे यांनी कोरोनाच्या लढाईत भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासनास सहकार्य करावे. जनतेच्या भाजपकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहन केले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हा सातत्याने कोरोनाबाबत आवश्यक सुविधा तातडीने व पुरेशा प्रमाणात उपलब्ध कराव्यात, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. शेखर इनामदार व स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांनी कोरोना साथीदरम्यान महापालिका प्रशासनाचे नियोजन व रुग्णांसाठी सुविधांची माहिती दिली. मकरंद देशपांडे म्हणाले, प्रभागनिहाय भाजप कार्यकर्त्यांच्या समितीने पक्ष पातळीवर नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार असल्याने लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी व गोंधळ होऊ नये, यासाठी प्रत्येक केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करावे.