दत्ता पाटील ।तासगाव : तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी भाजपकडून माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियातून, खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांचे नाव चर्चेत आले. त्यामुळे भाजपमध्ये संशयाचे धुराडे पेटले आहे. या चर्चेने घोरपडे समर्थकांत अस्वस्थता दिसून येत आहे. यानिमित्ताने उमेदवारीचे त्रांगडे निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
घोरपडे यांनी २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी फारकत घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्यांनी भाजपशी सूर जुळवले. त्याचवेळी २०१९ च्या विधानसभेसाठी घोरपडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मतदारसंघात तशी चर्चाही होती. लोकसभेसाठी घोरपडेंनी केलेला पैरा विधानसभेला खासदारांकडून फेडला जाईल, असे बोलले जात होते. पण दोन दिवसांपूर्वी तासगाव तालुक्यातील काही खासदार समर्थकांकडून विधानसभेसाठी खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांचे नाव चर्चेत आणले. या चर्चेने लोकसभेला शांत झालेले संशयाचे धुराडे पुन्हा पेटले आहे.
वास्तविक लोकसभा निवडणुकीवेळीच, घोरपडे विधानसभा लढविणार, हे स्पष्ट झाले होते. त्यासाठीच त्यांनी महिन्याभरापासून तासगाव तालुक्यात संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. याची पूर्ण जाणीव खासदार समर्थकांनादेखील आहे. मात्र तरीदेखील ज्योतीताइंच्या उमेदवारीची चर्चा व्हायरल करण्यात आली. ही चर्चा खासदारप्रेमापोटी होती, की जाणीवपूर्वक घडवून आणली आहे, याबाबत मतदार संघातील भाजप समर्थकांत काथ्याकूट सुरू झाला आहे.
घोरपडेंना विधानसभा निवडणुकीसाठी खासदारांची मदत घेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांच्या मदतीशिवाय ते मैदानात उतरणार नाहीत, हे स्पष्ट आहे. विधानसभेच्या निमित्ताने सरकारांनी राष्टÑवादीशी असलेली सोयरिकदेखील तोडलेली आहे. दुसरीकडे खासदारांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात मोळी घट्ट बांधली आहे. त्यामुळे ऐनवेळी ज्योतीतार्इंचे नाव पुढे रेटले गेल्यास, सरकारांची कोंडी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे ज्योतीतार्इंचे नाव चर्चेत आलेच कसे, याचीच चर्चा सुरु झाली असून या चर्चेने सरकार समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत तर भाजपमध्ये उमेदवारीचे त्रांगडे अन् संशयाचे धुराडे अशीच परिस्थिती असून खासदार संजयकाका पाटील यांच्या भूमिकेवरच पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे.गमती-जमती कशासाठी?ज्योतीतार्इंच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले आहे. ज्योतीतार्इंना उमेदवारी मिळाली तर विजय सोपा जाईल, असा एक सूर आहे, तर दुसरीकडे अजितराव घोरपडेंसारखा अनुभवी आणि जाणकार उमेदवार असेल, तर भविष्यात विकासाला चालना मिळविणे सोयीस्कर होईल. त्याहीपेक्षा दोन्ही नेते एकत्रित असणेच भाजपच्या हिताचे असल्याची चर्चा भाजपत सुरू आहे. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या चर्चेच्या गमती-जमती कशासाठी सुरू आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.