सदानंद औंधे ।मिरज : गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मिरज तालुक्यात भाजपने जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविले होते. गेल्या पाच वर्षात भाजपने ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत यश मिळविल्याने, भाजपला टक्कर देणे काँग्रेस उमेदवारासाठी आव्हान ठरणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भाजपवरील नाराजी व आ. सुरेश खाडे व खा. संजयकाका पाटील यांच्यातील छुप्या संघर्षाचा फायदा मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेस उमेदवाराला करावा लागणार आहे.
गत लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागासह शहरातही भाजपने मताधिक्य मिळवून काँग्रेसला धक्का दिला. खा. संजय पाटील यांच्या विजयानंतर मिरज मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मिरज पूर्व भागात माजी मंत्री मदन पाटील यांच्या गटाचे काँग्रेस कार्यकर्ते आता खा. पाटील यांच्या गोटात आहेत. आ. सुरेश खाडे यांना विरोध करणाऱ्या काँग्रेस व राष्टÑवादी नेत्यांशी खा. पाटील यांचे चांगले संबंध आहेत. त्याचा निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर मिरज पूर्व भागात काँग्रेस अस्तित्वहीन आहे. काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी असल्याने खा. पाटील यांचा गट प्रभावी आहे.
मात्र गत निवडणुकीत भाजपचे काम करणारे माजी मंत्री अजितराव घोरपडे विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे खा. पाटील यांच्यावर नाराज आहेत. मिरज पूर्व भागातील अनेक गावात घोरपडे यांच्या विकास आघाडीचे अस्तित्व आहे. घोरपडे गट यावेळी काँग्रेस उमेदवाराला मदत करण्याची शक्यता आहे. आ. खाडे यांचाही खासदारांसोबत छुपा संघर्ष आहे. मात्र लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका असल्याने दोघांतील संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे. खा. पाटील यांनी काँग्रेस व राष्टÑवादीतील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडून आणले आहे. मिरज पूर्व भागात एरंडोली व भोसे वगळता सर्वच ठिकाणी भाजपने यश मिळविले आहे. शहरातही महापालिका निवडणुकीत भाजपने यश मिळविल्याने गेल्या पाच वर्षात भाजपची ताकद वाढली आहे. या पार्श्वभूमीवर खा. पाटील यांना आव्हान देणे काँग्रेस उमेदवारासाठी कठीण ठरणार आहे.कॉँग्रेसमधील गटबाजी अडचणीचीमिरज विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. गत लोकसभा निवडणुकीत या इच्छुक उमेदवारांना जिल्हा परिषद मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र इच्छुक उमेदवारांनाही तेथे प्रभाव पाडता आला नाही. इच्छुक उमेदवार काँग्रेसमधील वेगवेगळ्या नेत्यांचे समर्थक असून त्यांच्या परस्परांवर कुरघोड्या सुरू असल्याने, काँग्रेसमधील गटबाजी उमेदवारासाठी अडचणीची ठरणार आहे.घोरपडेंचा पाठिंबा कोणाला?मिरज पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपने पंचायत समितीत सत्ता मिळविली आहे. मात्र पंचायत समितीत पदाधिकारी निवडीवरून खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्यात संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितराव घोरपडे समर्थक शालन भोई यांची सभापतीपदी निवड केली आहे. मात्र घोरपडे लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.