अशोक पाटील इस्लामपूर : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप आॅपरेशन लोटस ही मात्रा लागू करण्याच्या तयारीला लागली आहे. पुन्हा महाराष्ट्रात सत्ता आणू, असाही दावा भाजप करत असताना, वाळवा—शिराळ्यात मात्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कमळ फुलण्याअगोदरच खुडण्याची तयारी केली आहे. भाजपमध्ये नुकतेच गेलेले वैभव शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीची आॅफर दिल्याने शिंदे हे चांगलेच चलबिचल झाले आहेत.तत्कालीन युती शासनाच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर—शिराळा मतदार संघात भाजपचे कमळ फुलवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे, वाळवा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्वरुप पाटील आणि बहे येथील युवा नेते प्रसाद पाटील यांना भाजपमध्ये घेऊन इस्लामपूर मतदार संघात भाजप सक्षम करण्याचा प्रयत्न झाला. परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वीच जयंत पाटील यांनी हा डाव हाणून पाडत, फुलण्यापूर्वीच कमळ खुडून घेतले.इस्लामपूर पालिकेत नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यारुपाने भाजप सत्तेवर आल्याचा दावा केला जात होता. परंतु अल्पावधीतच त्यांची ताकद संपुष्टात आली. अपक्ष नगरसेवक दादासाहेब पाटील यांना आपल्याकडे घेऊन त्यांना उपनगराध्यक्षपद दिले.
त्यामुळे पालिकेवरील आपली पकड राष्ट्रवादीने अबाधित ठेवली. याचाच फायदा सभापती निवडी आणि विधानसभा निवडणुकीवेळीही झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपमधील ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.विलासराव शिंदे यांच्या निधनानंतर आष्टा येथील राजकीय समीकरणे बदलली. जयंत पाटील गट मजबूत करण्यासाठी मंत्री पाटील यांनी चांगलीच कंबर कसली आहे. विलासराव शिंदे यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभावेळी थेट, स्वरुप पाटील हे आमचेच आहेत असा चिमटा जयंत पाटील यांनी काढून त्यांची खिल्ली उडवली, तर वैभव शिंदे यांना राष्ट्रवादीची आॅफर देऊन शिंदे गटात खळबळ माजवून दिली आहे. मंत्री पाटील यांच्या आॅफरने वैभव शिंदे हे राष्ट्रवादीच्याच मार्गावर असल्याची चर्चा आष्टा परिसरात रंगू लागली आहे.