महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे धोरण - पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 01:57 PM2022-04-07T13:57:32+5:302022-04-07T13:58:10+5:30
शिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त देशाचा जसा नारा दिला, त्याचपद्धतीने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षाबाबत वेगळी भूमिका मांडली असली तरी आमच्या पक्षात विरोधाभास नाही, असे मत भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या की, आम्ही केवळ मोदींच्या धोरणानुसार चालत आहोत. आम्हाला आमचा पक्ष मजबूत करून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ भाजपचेच अस्तित्व दिसेल, यासाठी काम करायचे आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. याठिकाणी पक्ष मजबूत आहेच, मात्र ज्याठिकाणी काही कमतरता जाणवेल त्याठिकाणी आवश्यकतेनुसार राजकीय व्हिटॅमिन देण्याचा प्रयत्न आम्ही करु. गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. त्याचपद्धतीचे राजकारण मला करायचे आहे. या दोन्ही जिल्ह्यांत त्यांनी जोडलेली असंख्य माणसे असल्याने मला याठिकाणी चांगले काम करता येईल.
महाराष्ट्रातील कारभार सध्या अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे. मंत्रिमंडळातील अनेक लोक भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यामुळे कारवाई झाल्यानंतरही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाहीत. त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी शंका आहे.
न्यायालयांचे आदेश सूर्यप्रकाशासारखे
ईडीसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. या यंत्रणांच्या कारवाईविरोधात अनेकजण न्यायालयात गेले आहेत. न्यायालयांचे निकाल तर सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहेत, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
‘म्हैसाळ’ भ्रूणहत्येवर आवाज उठविणार
मुंडे म्हणाल्या की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे पाच वर्षांपूर्वी भ्रूणहत्येचे रॅकेट उघडकीस आले होते. पाच वर्षानंतरही विशेष सरकारी वकील का नियुक्त झाला नाही, याची चौकशी करून आवाज उठवू. पुण्यातील किडनी रॅकेटबाबतही भाजप विधानसभेत आवाज उठवेल.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारमुळे
राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण झाला आहे. न्यायालयात ओबीसींना न्याय मिळावा म्हणून मी देवाला साकडे घालते, असे मुंडे यांनी सांगितले.
नाईकांबद्दल आदरच
शिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या.