लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : औरंगाबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा जाहीर निषेध नोंदवित भाजप युवा मोर्चाच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात बुधवारी आंदोलन करण्यात आले.
शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, राज्याच्या गृहमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून त्यात राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना त्यात आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीच्या नेत्यावर तातडीने कारवाई करावी, असे ते म्हणाले.
युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने, किरण भोसले, अदित्य पटवर्धन, प्रथमेश वैद्य, ज्योती कांबळे, चेतन माडगूळकर, नगरसेवक निरंजन आवटी, इम्रान शेख, सुजित राउत, संदीप तुपे, कृष्णा राठोड, अमित गडदे आदी उपस्थित होते.