सांगली : जातीपातीच्या राजकारणाचा वापर करून भाजप सरकारने राज्यातील वातावरण दूषित केले आहे. देशातही अशीच परिस्थिती असल्याने या सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सोमवारी काँग्रेसच्या आंदोलनावेळी केली.
सांगलीत स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कदम यांच्यासह जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, निरीक्षक प्रकाश सातपुते, आनंदराव मोहिते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, माजी महापौर कांचन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कदम म्हणाले, आतापर्यंत साठ वर्षात कधीही समाजा-समाजात फूट पडलेली नव्हती. परंतु हे सरकार जाती-पातीचे विष पेरत असल्याने वातावरण बदलत आहे. लोकांमधूनच आता या गोष्टी थांबविण्याचे आवाहन केले जात आहे. दलितांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात आलेला कायदाही बदलण्याचा घाट घातला. त्यांच्यावर अत्यावर करुन त्यांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न स्पष्टपणे जाणवतो. मुस्लिम लोकांवर दबाव आणतानाच हिंदूंमध्येही दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू झाले आहेत. या सर्व गोष्टी भारताच्या सार्वभौमत्वाला घातक ठरणार आहेत. त्यामुळे त्या रोखण्यासाठी जनतेच्यावतीने राहुल गांधी संघर्ष करीत आहेत.
प्रतीक पाटील म्हणाले की, विरोधकांचे अधिकारही काढून घेण्याचे काम केले जात असल्याने संविधानाची चेष्टा केली जात आहे. ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत होती, तिथे जातीयवादाचा संघर्ष कधीच झाला नाही. मात्र ज्याठिकाणी भाजप सरकारची सत्ता आहे, तिथे जातीयवाद तीव्रतेने दिसून येत आहे.सत्यजित देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भा जपचे अध्यक्ष अमित शहा या दोन नेत्यांचे सरकार केंद्रात आहे. दोघांकडून वेगवेगळी राज्ये फोडण्याचे काम केले जात आहे. जातीय सलोखा टिकविण्यासाठी काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्यात काँग्रेस सशक्त करण्यासाठी आम्ही सर्व नेते, कार्यकर्ते एकत्र बसून रणनीती आखणार आहोत.
आंदोलनास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक अण्णासाहेब कोरे, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, ए. डी. पाटील, इंद्रजित साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, वहिदा नायकवडी, सुवर्णा पाटील, जितेश कदम उपस्थित होते.जनता आमच्याच पाठीशी!पृथ्वीराज पाटील म्हणाले की, काँग्रेसला जनतेचे बळ मिळत असल्याने आगामी काळात भाजपला सत्तेवरून पायउतार व्हावेच लागेल. सामाजिक सलोखा बिघडवून अशांतता पसरविण्याचा उद्योग सर्वत्र सुरू झाला आहे. कॉँग्रेसमार्फत त्यांचा हा डाव उधळून लावला जाईल.
तासगावात सत्तेचा गैरवापरतासगावात पोलिसांना मारहाण करण्याची घटना निंदनीय असल्याची टीकाही कदम व प्रतीक पाटील यांनी केली. पोलीस समाजाचे रक्षक आहेत. त्यांच्या कामात राजकीय दबावाने अडथळा आणणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.