अविनाश कोळीसांगली : बेकायदेशीर गॅस भरणा केंद्रांना सिलिंडर पुरविणाऱ्या एजन्सीचालकांचा काळाबाजार पोलिस, पुरवठा विभाग व पेट्रोलियम कंपन्यांच्या स्तरावर दुर्लक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे गॅस बॉम्ब पेरण्याचे प्रकार आजही सर्रास सुरू आहेत. सामान्य नागरिकांसाठी नियमावर बोट ठेवणाऱ्या एजन्सींना त्यांच्या सिलिंडरच्या काळा बाजाराबाबत कोणीही जाब विचारत नाही. त्यामुळे दुर्घटनांना निमंत्रण देण्याचा खेळ सांगली, मिरज शहरात रंगला आहे.
बेकायदेशीर गॅस भरणा केंद्रावर स्फोटाच्या दोन घटना घडल्यानंतर ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हा धोकादायक खेळ उजेडात आणला होता. सांगली व मिरज शहरांत सुमारे ३५ भरणा केंद्रे आढळून आली होती. काही पोलिस अधिकाऱ्यांनी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून कारवाई केली. काही भागातील गॅस भरणा केंद्र बंद झाले. पण, पर्यायी मार्गांनी धोक्याचा हा बाजार सुरूच आहे. ज्यांनी या बाजाराला सर्वांत मोठा हातभार लावला त्या गॅस एजन्सीचालकांना पोलिस, पुरवठा विभागाने अभय दिले. इतक्या मोठ्या प्रमाणावर सिलिंडर बेकायदेशीर उद्योगात जात असताना त्यांना कोणीही विचारत नाही.ग्राहकांच्या गॅस सिलिंडरचा हिशेब ठेवणाऱ्या कंपन्या, पुरवठा विभाग कधीही अशा बेकायदेशीर व धोकादायकरीत्या केल्या जाणाऱ्या गॅस पुरवठ्याच्या स्रोतांची माहिती घेत नाहीत किंवा जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतात.
मिळालेल्या माहितीनुसार हा काळाबाजार करण्यासाठी पाच गॅस एजन्सीचालकांचा हातभार आहे. स्फोटाच्या घटना घडल्यानंतर सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढणे अपेक्षित होते, मात्र जुजबी कारवाई करून या एजन्सीचालकांना अभय देण्याचा प्रकार घडला.
दररोज दोन लाखांची कमाईघरगुती गॅस सिलिंडरचा दर सध्या ९०६ रुपये आहे. काळ्या बाजारात अशा अड्डेचालकांना एजन्सीचालकांकडून तो १२०० रुपयांनी पुरविला जातो. प्रतिसिलिंडर एजन्सीचालकाच्या खिशात ३०० रुपये पडतात. दिवसाकाठी सांगली व मिरजेत एकूण ६०० सिलिंडरचा काळाबाजार होतो. त्याचा हिशेब केला तर दिवसाकाठी एजन्सीचालकांच्या पदरात सुमारे २ लाख रुपये पडतात.
पुरवठा विभागाचे मौनमिरजेत सिलिंडर स्फोटाच्या दोन घटना घडल्या. पोलिसांनी कारवाईत अनेक गॅस भरणा केंद्रांवर कारवाई केली. तरीही पुरवठा विभागाने हे सिलिंडर पुरविणाऱ्या एजन्सीचालकांवर कारवाई का केली नाही, त्यांनी मौन का बाळगले, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.