लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाबाधितांवर उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रविवारी उघडकीस आला आहे. रुग्णांसाठी दिलेले रेमडेसिविर इंजेक्शन चोरून बाहेर तब्बल ३० हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी सुमित सुधीर हुपरीकर (वय ३२, रा. समृद्धीनगर, विश्रामबाग, सांगली) याच्यासह खासगी प्रयोगशाळा तंत्रज्ञ दाविद सतीश वाघमारे (वय २५, रा. कुपवाडरोड, विजयनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच, त्यावर उपचारासाठी प्रभावी इंजेक्शन म्हणून रेमडेसिविरचा वापर केला जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच राज्यभरातूनही रेमडेसिविरच्या काळाबाजाराच्या बातम्या येत असतानाच आता मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयातील अधिपरिचारकच या इंजेक्शनचा काळाबाजार करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याला या कामात विश्रामबाग येथील खासगी प्रयोगशाळेत काम करणारा त्याचा मित्र दाविद हा मदत करत होता.
रविवारी सकाळी संशयित दोघेही रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विलिंग्डन महाविद्यालयासमोर थांबले होते. याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले व तपासणी केली असता, त्यांच्याजवळ रेमडेसिविरची एक कुपी आढळून आली. यावेळी त्यांनी एक इंजेक्शन यापूर्वी आम्ही ३० हजार रुपयांना विकले असून, हेही इंजेक्शन ३० हजार रुपयांना विकणार होताे, अशी माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी औषध निरीक्षक विकास पाटील यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.
चौकट
मृत रुग्णांच्या रेमडेसिविरवर डल्ला
मिरज शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. यात गंभीर असलेल्या रुग्णांना सहा डोस दिले जातात. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ते शिल्लक राहिलेले डोस हे अधिपरिचारकाकडेच असतात. नेमकी हीच संधी साधून संशयिताने यापूर्वी एक आणि आता एक अशी दोन इंजेक्शन तेथून काढली होती. त्यामुळे मृत रुग्णांच्या रेमडेसिविरवरच संशयितांनी डल्ला मारला आहे.
चौकट
रेमडेसिविरचा काळाबाजार खपवून घेणार नाही.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याने जीवनावश्यक वस्तूंमध्ये त्याचा समावेश केला आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी पोलिसांना सूचना दिल्या असून, कुठेही जादा दराने रेमडेसिविर विक्री होत असल्याची माहिती असल्यास तातडीने ती पोलिसांना कळवावी. कोणत्याही परिस्थितीत रेमडेसिविरचा काळाबाजार खपवून घेणार नाही.