सांगली : आंधळी (ता. पलूस) येथील नाईक मळा याठिकाणी अनुप मोहन माने यांच्या शेतात जावळ विधीला मातीची काळी बाहुली, हिरवे कापड, बांगड्या व पूजेचे साहित्य जमा करून तेथे बोकडाचा बळी दिला जात असल्याच्या प्रथेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी भांडाफोड केला. अंनिसने पोलिसांच्या मदतीने हे साहित्य जप्त केले. हे साहित्य पाहून माने यांना भानामती केल्याचा संशय आला होता. पण नेमका काय प्रकार होत असे, हे अंनिसने ग्रामस्थांच्या निदर्शनास आणले.अनुप मोहन माने यांनी त्यांच्या शेतात भानामतीचा प्रकार होत असल्याची तक्रार अंनिसकडे केली होती. अंनिसचे राज्य कार्यवाह राहुल थोरात हे आंधळीला आले. पलूस तालुका अंनिसचे पदाधिकारी डॉ. अमोल पवार, कॉ. मारुती शिरतोडे, विशाल शिरतोडे, रोहित पाटील यांच्याशी चर्चा करून थोरात यांनी पलूस पोलीस ठाणे गाठले.
सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर पलूसचे पोलीस व अंनिसचे पदाधिकारी माने यांच्या शेतात गेले. तिथे मातीची बाहुली, हिरवे कापड, बांगड्या, रक्ताचे डाग, दगडाची चूल, जळण आदी साहित्य आढळून आले.पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, हा प्रकार माने यांच्या शेताशेजारी राहणाऱ्या पवार नामक व्यक्तीने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पवार यांना चौकशीसाठी बोलाविले. त्यावेळी त्यांनी ह्यआमच्या घराण्यामध्ये नातवाच्या जावळ विधीसाठी बोकड बळी देण्याची प्रथा आहे.
जावळाचा विधी करताना आम्ही मातीची बाहुली तयार करुन तिला हिरवे कापड नेसवून तिची काटेरी झुडपाखाली पूजा करतो. आम्ही हा विधी करणी-भानामतीसाठी केला नाही, तर तो आमचा जावळ विधी आहेह्ण, असे सांगितले. पोलिसांनी पवार यांचा जबाब नोंदवला.