मिरज : मिरजेत पाणीपुरवठा विभागाकडील ब्लिचिंग पावडर संपल्याने पाणी शुद्धीकरणासाठी फक्त क्लोरिन वायू वापरण्यात येत आहे. क्लोरिनच्या शंभर टक्के वापरामुळे पाण्याची चव बदलल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिरजेत दररोज २८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा व तेवढ्याच पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिन वायू व ब्लिचिंग पावडरचा समप्रमाणात वापर करण्यात येतो. पाणी शुद्धीकरणासाठी दरमहा दीड टन ब्लिचिंग पावडरची मिरज पाणीपुरवठा विभागाला आवश्यकता आहे. गेले आठ दिवस ब्लिचिंंग पावडरचा साठा संपला आहे. ब्लिचिंग पावडरचा पुरवठादार निश्चित झालेला नसल्याने ब्लिचिंंग पावडरचा पुरवठा थांबला आहे. यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी केवळ क्लोरिनचा वापर सुरू आहे. शंभर टक्के क्लोरिनचा वापर केल्यामुळे पाण्याला क्लोरिनचा वास येत आहे. क्लोरिनचा शंभर टक्के वापर केल्याने पाणी शुद्धीकरणाचा दर्जा कमी होत नाही. मात्र क्लोरिनचा वास टाळण्यासाठी ब्लिचिंंग पावडरचा उपयोग करण्यात येतो. ब्लिचिंंग पावडरची मागणी करण्यात आली आहे. चार दिवसात पुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा अभियंता बी. एस. पाटील यांनी सांगितले. मिरजेत सुमारे ३० हजार पाणी कनेक्शन आहेत. दरमहा तीन कोटी रुपये पाण्याचे बिल होते. मात्र तीस हजार रुपये किंमतीची ब्लिचिंग पावडर पाणीपुरवठा विभागाला उपलब्ध झालेली नाही. (वार्ताहर)
पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंगचा साठा संपला
By admin | Published: July 15, 2014 12:48 AM