शिराळा : शिराळा येथील महावितरण कार्यालयसमोर भाजप कार्यसमितीचे सदस्य सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वाढीव वीज बिलातील त्रुटी दूर करा, वीज बिलासाठी विद्युत कनेक्शन तोडू नका यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
ज्येष्ठ नेते जयसिंगराव शिंदे, प्रतापराव पाटील, नगरसेवक केदार नलवडे , भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई पाटील, अनिल घोडे-पाटील, संभाजी पाटील, रोहित देसाई, सागर जंगम यांनी वीज ग्राहकांच्या समस्या मांडल्या.
एक वर्षापासून कोरोना आणि टाळेबंदीने जनता त्रस्त आहे.
अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. हा तालुका डोंगरी असून, सामान्य शेतकरी बांधव कोरोनामुळे अडचणीत सापडला आहे. उद्योग धंदे, रोजगार बंद अवस्थेत आहेत. कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. याचा विचार करून ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले गेले आहे त्यांचे वीज कनेक्शन कोणतेही शुल्क न लावता जोडावे. डोंगरी शिराळा तालुक्यातील शेतकरी बांधवांची रब्बी सुगी सुरू आहे. त्यामुळे शेतीला वीज पुरवठा सुरळीतपणे करावा. ग्राहकांचे कनेक्शन तोडू नये. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी हरून शेख, रुपेश चव्हाण, अशोक पाटील, रामभाऊ जाधव, सुमित पाटील, शरद पाटील, हारुण शेख, राहुल खबाले, मनोज पाटील, विठ्ठल पाटील, सूरज पाटील, रोहोन नाकील, विशाल सातपुते, सचिन दिवटे, अभिषेक हसबनीस, आदी उपस्थित होते.
चौकट
कनेक्शन तोडणार नाही
अभियंता प्रल्हाद बुचडे यांनी वीज कनेक्शन तोडणार नाही, ग्राहकांना हप्ते पाडून वीज बिल भरण्यास सोय करू, त्याचबरोबर विद्युत कंपनीचे कर्मचारी ग्राहकांना त्रास होईल अशी भाषा वापरणार नाहीत. वीज बिलातील त्रुटी दुरुस्त करून देणार असल्याचे आश्वासन दिले.