लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हाबंदीसह कडक निर्बंधांच्या अंंमलबजावणीसाठी पोलीस कार्यरत झाले आहेत. अत्यावश्यक कारणांशिवाय जिल्ह्यात प्रवेशाला बंदी असल्याने, आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. तपासणी करूनच सोडले जात आहे. जिल्ह्यात ९९ नाकाबंदी पॉइंट सुरू करण्यात आले आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले, तरीही ते नागरिकांकडून गांभीर्याने घेतले जात नव्हते. त्यामुळे शासनाने सुधारित आदेश काढत जिल्हाबंदी लागू केली आहे. त्यानुसार, बाहेरच्या जिल्ह्यातून प्रवेशासाठी आता अत्यावश्यक कारणांसह परवानगी आवश्यक आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली.
जिल्ह्यातील ११ ठिकाणी सीमा असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी करून, त्याची नोंदणी करून, कारण तपासूनच प्रवेश दिला जात आहे. यासाठी २४ तासांसाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
केवळ जिल्हासीमांवर तपासणी न करता, जिल्ह्यांतर्गतही ९९ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येत आहे. या नाकाबंदीमध्ये विनामास्क फिरणारे, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या नाकाबंदीमध्ये २२० जणांवर कारवाई करत, त्यांच्याकडून एक लाख ३,७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर इतर ६०० खटले दाखल करत एक लाख ४३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत वाहने जप्त करण्यात येत असून, अशी कारवाई पुढेही चालूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर फिरू नये. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर फिरताना मास्कचा वापर करावा. विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई आदेश देण्यात आले आहेत.
दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक
चौकट
असा आहे पोलीस बंदोबस्त
नाकाबंदीसाठी जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात २२ अधिकारी, २३८ पोलीस कर्मचारी आणि २३९ होमगार्ड तैनात असणार आहेत.