फोटो ओळ : भिलवडी - अंकलखोप रस्त्यावर भिलवडी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्यातर्फे सहा पथकांकडून बंदोबस्त तैनात केला आहे. यात नाकाबंदी पथक, विनामास्क कारवाई पथक, बीट पथक, होम आयसोलेशन चेक पथक, एम.व्ही. ॲक्ट केसेस पथक, मेगा फोन, मोबाइल जनजागृती पथक या सहा पथकांची नेमणूक केली आहे.
भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील पोलीस पाटील, सरपंच यांना सूचना दिल्या आहेत. भिलवडी व्यापारी संघटनेचा लाऊड स्पीकर, सोशल मीडियाचा वापर करून तसेच विविध ऑडियो, व्हिडिओ क्लिपद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पोलिसांच्या गांधीगिरीच्या पवित्र्यास नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
विनाकारण तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच शासन नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी दिली.