सांगली : शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतिदिनी मंगळवारी (दि. २३) डॉक्टरांच्या ‘नीमा’ संघटनेसह विविध संघटनांनी देशव्यापी महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे. दीड हजार शिबिरांच्या माध्यमातून ९० हजार बाटल्या रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट आहे.
कोरोनाचे लसीकरण सुरू असल्याच्या काळात रक्ताची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. तिला तोंड देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (नीमा), नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट ॲण्ड ॲक्टिव्हिस्ट नॅशन कौन्सिल, सोसायटी ट्रान्स्पोर्ट ॲण्ड मेट्रॉलॉजी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चेंबर ऑफ कॉमर्स, ब्रम्हाकुमारीज यासह विविध संघटनांनी आयोजन केले आहे. या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रत्येक दात्याला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यावर नामवंत खेळाडू, अभिनेते, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या डिजिटल स्वाक्षरी असतील. ‘नीमा’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
चौकट
गिनिज बुकात नोंदीचे प्रयत्न
देशातील २८ राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेशांत एकाचवेळी दीड हजार शिबिरे होतील. ९० हजार बाटल्या रक्त संकलित केले जाईल. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारा घेतली जाणार आहे. कोविड लस घेतलेल्या लाभार्थ्यांना फक्त नोंदणी करता येईल, २८ दिवसांनंतर ते रक्तदान करू शकतील.