- अविनाश कोळी सांगली : केस पेपरच्या चिटकोऱ्यावर संपूर्ण रक्ताचा अहवाल लिहायचा... ईसीजी, एक्स-रेचे निरीक्षण हाताने नोंदवायचे अन् डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्यांसाठी कित्येक तास रांगेत ताटकळत थांबायचे, असे प्रकार सध्या राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात सुरू आहेत. चार महिन्यांपासून ही रुग्णालये ऑफलाइन झाल्याने राज्यभर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत.
डिजिटल इंडिया अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये ऑनलाइन कारभार करत असताना जुलै २०२२मध्ये एका रात्रीत अचानक संबंधित एजन्सीला काम बंद करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. तेव्हापासून गेले चार महिने रुग्णालयातील कामकाज ऑफलाइन झाल्याने केस पेपरपासून विविध वैद्यकीय अहवालही हाताने लिहून देण्याची वेळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर आली आहे.
या अडचणींमुळे रुग्ण हैराण
रुग्णांचे वैद्यकीय अहवाल हाताने लिहावे लागत आहेत. एक्स-रे, ईसीजीचे निरीक्षण डॉक्टरांना हातानेच नोंदवावे लागत आहे.ज्याठिकाणी एक्स-रे प्रिंटर बंद पडतो तिथे संगणकावरील चित्र मोबाइलवर घेऊन डॉक्टरांना दाखवावे लागते.जे अहवाल तासात मिळायचे त्यांना आता २ ते ३ दिवसांचा अवधी लागत आहे.फिटनेस प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांना अनेक तास रांगेत थांबावे लागत आहे.