सांगली : सांगलीतील तात्यासाहेब मळा परिसरात शुक्रवारी दुपारी गणेश राजू रजपूत (वय २६, रा. म्हसोबा मंदिराजवळ आरवाडे पार्क) या सेंट्रिंग कामगाराचा डोक्यात दांडक्याने मारून खून करण्यात आला. याप्रकरणी सचिन संतराम होळीकट्टी (वय ३३, रा. गोकुळनगर) व त्याचा साथीदार चंद्रकांत ऊर्फ पिंटू नारायण पुजारी (४०, रा. माने दूध डेअरीसमोर, कलानगर) यांना पोलिसांनी अटक केली. संशयित सचिनच्या पत्नीला फूस लावून पळवून नेल्याच्या रागातून ही घटना घडल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.गणेश रजपूत सेंट्रिंग कामगार होता. तो आरवाडे पार्कजवळील म्हसोबा मंदिराजवळ आई-वडील, बहीण-भाऊजी यांच्यासह राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. संशयित सचिन होळीकट्टी व गणेश या दोघांची ओळख होती. सचिनच्या घरात पत्त्यांचा जुगार चालत होता. गणेश हाही जुगार खेळण्यासाठी जात असे. त्यातून सचिनची पत्नी माधवीशी त्याची ओळख झाली. सचिन आणि माधवीला एक मुलगी व दोन मुले आहेत. सहा महिन्यांपूर्वी गणेशने माधवीला फूस लावून पळवून नेले. माधवीबरोबर तिचा सहा वर्षाचा मुलगाही होता. त्यामुळे सचिनचा गणेशवर राग होता. त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्यादही विश्रामबाग पोलिसांत दिली होती.गणेश माधवीसह काही काळ पुण्यात आणि सोलापूरला राहिला. काही महिन्यानंतर त्याने सचिनच्या मुलाला पुन्हा सांगलीत आणून सोडले होते. सध्या ते पुण्यात राहत होते. पत्नीला पळवून नेल्याने सचिन गणेशवर चिडून होता. तो गणेशच्या घरी जाऊन, आई व भाऊजीला त्याची माहिती विचारत होता. दमदाटी करून धमकीही देत होता. या त्रासाला कंटाळून आई व भाऊजी आरवाडे पार्कमधील घर सोडून बसस्थानकाजवळील मुजावर प्लॉटमध्ये भाड्याने राहण्यास गेले होते.गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गणेश सांगलीत आला. तो आईकडे गेला. त्याने आरवाडे पार्कनजीकच्या घराकडे जाण्याचा हट्ट धरला. परंतु आईसह सर्वांनी, त्या भागातील लोक तुझ्यावर चिडून आहेत, तिकडे जाऊ नको, असे बजावले. त्यानंतर गावाकडे जातो, असे सांगून त्याने आईकडून काही पैसे घेतले. मात्र गावाकडे न जाता तो आरवाडे पार्कमधील घराकडे गेला.दारूच्या नशेत त्याने बंद घराच्या दारातच झोपून रात्र काढली. सकाळी हल्लेखोरांना गणेश आल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला जबरदस्तीने रिक्षात घालून तात्यासाहेब मळा परिसरात आणले. काटेरी झुडपात असलेल्या इंद्रनील शेठ यांच्या रिकाम्या पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन त्याचे हातपाय बांधले. लाकडाच्या दांडक्यांनी त्याच्या डोक्यावर मारून त्याचा खून केला.या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. विश्रामबाग पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी गणेशच्या आई व बहिणीचा आक्रोश सुरू होता.तासाभरात संशयित जेरबंदखुनाच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, उपनिरीक्षक शरद माळी, प्रवीण शिंदे व दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथक सांगली शहर व विश्रामबाग परिसरात संशयितांचा शोध घेत होते. यावेळी शिंदे मळा परिसरात संशयित सचिन व चंद्रकांत रिक्षातून (क्र. एमएच १० के. ३४३६) फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून रिक्षा व मोबाईलही जप्त केला आहे. संशयितांना पुढील कारवाईसाठी विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सलग तिसऱ्यादिवशी खूनगणेश राजपूत याचा खून ही गेल्या तीन दिवसातील जिल्'ातील तिसरी घटना आहे. बुधवारी पहाटे सांगलीत शंभरफुटी रोडवरील पाकीजा मशिदीच्या मागे जमीर पठाण यांचा मेहुण्याने भोसकून खून केला. गुरुवारी रात्री मिरज तालुक्यातील मालगावात व्यंकटेश ऊर्फ एनटी त्रिभुवन काळे याचा सासरा आणि मेहुण्यांनी खून केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी सांगलीत गणेश राजपूत या तरुणाचा खून झाला. दोन आठवड्यापूर्वी संजयनगर येथे सुभाष बुवा यांचा खून झाला होता. खुनांच्या मालिकांनी शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.
पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:02 AM