तासगाव : तालुक्यातील मणेराजुरीतील येथील शेकोबा डोंगरावर तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. या तिघांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली आहे. यामध्ये एका तरुणांचा तर दोन युवतींचा समावेश आहे. तिघांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. ही घटना आज, गुरुवार (ता.२३) सकाळी उघडकीस आली. याघटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी), प्रणाली उद्धव पाटील(१९, मूळ गाव जायगव्हाण, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. मणेराजुरी) आणि हातीद (ता. सांगोला) अशी या मृत तिघांची नावे आहेत. यातील एका युवतीची अद्याप ओळख पटली नाही. बुधवारी रात्रीच्या सुमारास या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केले असावे,अशी शंका व्यक्त होत आहे.घटनास्थळी द्राक्ष बागेसाठी लागणारी विषारी द्रव्य असणारी बाटली सापडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून नोंद करण्याचे काम सुरू आहे.
प्रेमाचा त्रिकोण की आणखी कारण?
आत्महत्या केलेल्या हरीश जमदाडे या तरुणाचे नात्यातीलच प्रणाली या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा घटनास्थळावर होती. प्रणालीचे मूळ गाव जायगव्हाण असले तरी ती मणेराजुरीत नातेवाइकांकडे राहत होती. तिने साडी परिधान केली होती. घटनास्थळी हार-तुरे असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचे नियोजन केले असावे, असे बोलले जात आहे. मात्र, डोंगरावर येतानाच कीटकनाशकाची बाटली घेऊन आल्यामुळे त्यांनी नियोजन करूनच आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. शिवानी घाडगे ही तरुणी हतीद येथील असून, हरीशच्या मित्राची नातेवाईक असल्याची चर्चा होती. त्यामुळे तिघांची आत्महत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली की, आणखी काही कारणांमुळे झाली, याचा नेमका उलगडा रात्रीपर्यंत झालेला नव्हता.