सांगली : शिराळा तालुक्यातील शिरसी-शिवरवाडी रस्त्यावरील चक्रभैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह शनिवारी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. डोक्यात मागील बाजूला धारदार शस्त्राने वार करुन हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेहाजवळ लिंबू, हळद-कुंकू व टाचण्या सापडल्याने नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे.
शिरसी-शिवरवाडी रस्त्यावर अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावर चक्रभैरवनाथ मंदिर आहे. हा परिसर निर्जन आहे. गेल्या काही महिन्यापासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजता गवंडी व मजूर मंदिराच्या कामावर आले. त्यावेळी त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात अज्ञाताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती दिली.
मंदिरात खून झाल्याचे समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. शिराळा पोलिसांनी भेट दिली. मृतदेहाशेजारी लिंबू, हळद-कुंकू, टाचण्या व अन्य पूजेचे साहित्य पडले होते. तसेच एक पिशवी सापडली आहे. त्यामध्येही पूजेचे साहित्य आहे. अज्ञाताच्या डोक्यात पाठीमागून धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असावी.
मंदिर परिसरात सायंकाळनंतर अजिबातच वर्दळ नसते. याची संधी साधून हल्लेखोरांनी नरबळीच्या उद्देशाने खून केल्याचा संशय आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकास पाचारण केले होते. मंदिर परिसरात तपासणी करुन काही पुरावे मिळतात का, याचा पोलिसांनी शोध घेतला.
मृताची ओळख अजून पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांना तपास कामात अडथळा निर्माण झाला आहे. मृतदेहाची छायाचित्रे काढून त्याआधारे पोलिसांनी ओळख पटविण्याचे काम सुरु केले आहे. पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणीसाठी पाठविला आहे.अमावास्येला डाव साधलाशुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता अमावास्येला प्रारंभ झाला. शनिवारी सायंकाळी साडेपाचला अमावास्या संपली. याची संधी साधून हल्लेखोरांनी चक्रभैरवनाथ मंदिरात हा बळी घेतला असावा, अशी घटनास्थळी चर्चा सुरु होती.
या मंदिरात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. मंदिर जीर्णोद्धारासाठी आलेल्या गवंडी व मजुरांकडे पोलिसांनी चौकशी केली आहे, पण अजूनही कोणतेही धागेदोरे लागले नाहीत. मृताची ओळखही पटलेली नाही.