सांगली: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा बेपत्ता तरुणाचा गुरुवारी काळ्या खणीत मृतदेह आढळून आला. पोलिस व अग्निशमन दलाच्या पथकाने खणीतून मृतदेह बाहेर काढला. आदित्य सचिन राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. हा घातपात आहे कि आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की आदित्य हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील आहे. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल विभागात पदवीचे शिक्षण घेतो. सध्या तो तिसऱ्या वर्षात होता. महाविद्यालयाजवळ तो भाड्याने खोली घेऊन राहत होता. मंगळवारी रात्रीपासून तो बेपत्ता होता. त्याच्या मित्रांनी शोधाशोध केली. मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर नातेवाईंकांनी सांगलीत धाव घेत पोलिसांत फिर्याद दिली होती.
त्याची दुचाकी कर्मवीर चौकातील काळ्या खणीजवळ मिळून आली होती. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह काळ्या खाणीमध्ये तरंगताना आढळला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. यांत्रिक बोटीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह आदित्य राठोडचा असल्याने निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविला. याठिकाणी शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. दरम्यान, अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह काळ्या खाणीत सापडल्याने खळबळ उडाली होती. त्याने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.