यासंदर्भात अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष आयुब पटेल म्हणाले, भंडारा हॉस्पिटल दुर्घटना, मुंबईत गॅस सिलिंडर गुदामामध्ये स्फोटाची दुर्घटना अशी अनेक ठिकाणी आगीचे जीवघेणे प्रकार घडत आहेत. केवळ अग्निसुरक्षेच्या खबरदारीअभावी त्याची भयावहता वाढते. यामुळे सर्वत्रच खबरदारीअंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात तसेच जिल्ह्यात अग्निसुरक्षेसाठी फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार खासगी तसेच शासकीय हॉस्पिटल, हॉटेल्ससह सर्वच गर्दीच्या ठिकाणी आस्थापनांमध्ये त्याची पडताळणी ऑडिट सुरू आहे.
ते म्हणाले, वास्तविक यासाठी मुख्य अग्निमशमन अधिकार्यांच्या पात्रतेबाबतच तक्रारी आहेत. त्यातच त्यांनी शहरातील हॉस्पिटल्ससह अन्य ठिकाणी फायर ऑडिट केल्याचा दावा केला आहे. परंतु ते करताना त्यातील त्रुटी दूर करणे आणि त्याची पूर्तता करताना शासनमान्य यादीवरील अग्निसुरक्षेचे काम करणार्या कंपनीकडूनच काम करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भातील सर्व खातरजमा झाल्याशिवाय फायर ऑडिटचा दाखला देणे चुकीचे आहे. परंतु शहरात सर्वच ठिकाणी झालेल्या फायर ऑडिटबाबत पूर्तता ज्या कंपनीने केली आहे. ती दोन वर्षांपासून शासनाच्या यादीवरच नाही. तरीही अधिकार्यांनी सोयीस्कर त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील बहुसंख्य ठिकाणी या कंपनीमार्फत काम करून दाखले दिले आहेत. त्यामुळे या बोगस कारभाराला संबंधित मुख्य अग्निशमन अधिकारीच जबाबदार आहेत. जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारू.