सांगली : राज्यात आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षकांची सुमारे तीन हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया झाली आहे. या पदासाठी उमेदवारांना स्वच्छता निरीक्षकांच्या अनुभवाची प्रमाणपत्रे काही बोगस संस्थांनी पैसे घेऊन दिली आहेत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस संस्थांवर शासनाने कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाने आरोग्य सहसंचालकांकडे केली आहे.आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा झाली आहे. आरोग्य सेवक एक हजार ४६६, आरोग्य निरीक्षक ४७२ आणि आरोग्य पर्यवेक्षक ५० पदांसाठी भरती झाली. यामध्ये राज्यभरातून अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम, बारावी सायन्स व बीएस्सी शिक्षण पूर्ण असणे गरजेचे होते. त्यानुसार उमेदवारांनी काही संस्थांकडून स्वच्छता निरीक्षक कोर्सच्या अनुभवाचे प्रमाणपत्र जोडले आहे.पण, राज्यातील संस्थांना स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम घेण्याची मान्यताच नाही. यामुळे आरोग्य भरतीमध्ये खासगी संस्थांचे प्रमाणपत्र पात्र ठरत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्रांची चौकशी केली पाहिजे. यामध्ये हजारो उमेदवारांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे दिसून येणार आहे. म्हणूनच शासनाने राज्यातील सर्व उमेदवारांच्या स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्रांची स्वतंत्र समितीतर्फे छाननी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष विजय मोहोरकर यांनी केली आहे.
स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमास संस्थांना मान्यताच नाहीस्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र परावैद्यक परिषदेची मान्यता गरजेची आहे. पण, या संस्थेकडून महाराष्ट्रातील एकाही संस्थेने मान्यताच घेतली नाही, असा खुलासा महाराष्ट्र परावैद्यक परिषदेचे प्रबंधक दिशा गुडूळकर यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे. तरीही राज्यातील उमेदवारांनी स्वच्छता निरीक्षकाची प्रमाणपत्रे खासगी संस्थांची जोडली आहेत. या प्रमाणपत्रांची छाननी होण्याची गरज आहे.