सांगली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती तपासणीचे आदेश दिले होते. यात जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे सात-बारा नसताना कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतल्याने १२ व्यक्तींवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशाच पध्दतीने जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील या योजनेचा गैरलाभ घेण्यात आल्याची शक्यता असल्याने बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकºयांची माहिती तलाठ्यांकडून घेऊन शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी योजनेचा गैरलाभ घेतला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशी एकूण १४१ प्रकरणे असून यातील अपात्र ११० कर्ज खात्यांवर सुमारे ९२ लाख ४२ हजार ८३३ रूपयांची गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे.
या शेतकऱ्यांनी घेतलेली लाभाची रक्कम पुन्हा शासनजमा करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय बॅँकांनीही ही रक्क म कर्जखात्यावर वर्ग न करता ती शासनजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा उपनिबंधकांना या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.तपासणी अहवालातून १४१ पैकी एकूण ११० अपात्र कर्ज खात्यांवर ९२ लाख ४२ हजार ८३३ रुपये गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी सांगितले.