शिरटे : समाजाशी काही देणेघेणे नसणाऱ्यांनी कोरोना काळात स्वत:चा दवाखाना बंद ठेवला. त्यांचे शहाणपण खडू-फळ्यापुरतेच आहे. कृष्णा कारखान्यात तोडणी वाहतुकीसाठी दरवर्षी २० कोटींची गरज असताना मागील घोटाळेबाज सत्ताधाऱ्यांनी ६० कोटी रुपये खर्च टाकून बोगस कर्जप्रकरणे केली. याचा सर्व हिशेब त्यांना चुकता करावा लागणार असल्याचे प्रतिपादन कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी केले.
खरातवाडी, फार्णेवाडी (ता. वाळवा) येथे कारखाना सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, अजितराव थोरात, ‘कृष्णा’चे संचालक जितेंद्र पाटील, संजय पाटील, अमोल गुरव, सुजित मोरे, मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोसले म्हणाले की, महाराष्ट्रातील साखर कारखानदारीत सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या काळात कृष्णा अव्वलस्थानी होता. मध्यंतरी काही सत्ताधारी मंडळी अपघाताने सत्तेवर आली आणि राज्यात कृष्णेच्या नावलौकिकास गोलबोट लागले. पाच वर्षांपूर्वी सभासदांनी सत्तांतर घडविले म्हणून कारखाना वाचला. यावेळी सरपंच पृथ्वीराज खरात, अविनाश खरात, भानुदास खरात, शिवाजी पाटील, बी. जी. पाटील, सीताराम हुबाले उपस्थित होते. फोटो ओळ : खरातवाडी (ता. वाळवा) येथे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद संपर्क दौऱ्यात डॉ. अतुल भोसले यांनी मार्गदर्शन केले.