सांगली : शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास, त्यांचे अद्भुत दुर्गवैभव या सर्व गोष्टींच्या अभ्यासाची चव अंध विद्यार्थ्यांनाही चाखता यावी, या दृष्टीने मिरजेतील सुशिलाबाई घोडावत अंध शाळेने चक्क ब्रेल लिपीतील पुस्तक साकारले. इतकेच नव्हे तर अंध विद्यार्थी आता याच पुस्तकाच्या माध्यमातून शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास मांडताना दिसत आहेत.नॅब संचलित सुशिलाबाई घोडावत अंध शाळेत हा उपक्रम आकाराला आला. दुर्ग अभ्यासक प्रवीण भोसले यांनी लिहिलेलं 'शिवदुर्ग यात्रा' हे किल्ल्यांच्या माहितीचं पुस्तक ब्रेल लिपीत लिप्यांतर करण्याचे ठरविले. शाळेतील ब्रेल लिपी शिक्षिका उज्ज्वला हिरेकुडी यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष विजय लेले, मुख्याध्यापक जी. व्ही. कुचेकर, सहशिक्षिका अनिता गायकवाड, अर्चना बारसे यांच्या सहकार्याने ब्रेल लिपीतील पुस्तक परिश्रमपूर्वक तयार केले. या पुस्तकात शिवनेरी ते रायगड अशा ३० निवडक आणि महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती आहे. ब्रेल लिपीतील या पुस्तकामुळे अंध विद्यार्थांना दुर्ग भटकंतीची अनुभूती मिळणार आहे.शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असणा-या या गडकोटांची माहिती अंध विद्यार्थांना होत आहे. महाराष्ट्राला गडकोटांची मोठी परंपरा आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शेकडो किल्ले आहेत. शिवरायांच्या जीवनचरित्रांतील अनेक महत्त्वाचे प्रसंग, लढाया या किल्ल्यांच्या साक्षीनेच झाल्या आहेत. छत्रपतीच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या या किल्ल्यांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली. मात्र , ती सारी डोळस व्यक्तींसाठी होती. अंध मुलांना या गडकोटांची माहिती मिळावी, यासाठी घोडावात अंध शाळेने अभिनव उपक्रम हाती घेतला. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय लेले, सामाजिक कार्यकर्ते मोहन वाटवे, चिंतामणी पटवर्धन, प्रा. प्रकाश कुलकर्णी, सुधीर नाईक, आनंद लेले, अर्चना लेले यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक जी. व्ही. कुचेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिता गायकवाड यांनी तर आभार अर्चना बारसे यांनी मानले.
शिक्षिकेने तयार केले ब्रेलमधील पुस्तक, कौतुकास्पद उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 9:45 PM