संख : संख (ता. जत) येथील बोर नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पावसाअभावी खरीप पेरणी नाही. चारा नाही, पाणी नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.जत पूर्व भागात यंदा एकही मोठा पाऊस झाला नाही. उन्हाळी नाही, वादळी नाही आणि वळीवही नाही. अशा परिस्थितीमुळे चालूवर्षी खरीप हंगामाची पेरणी जेमतेम प्रमाणात झाली. ७० ते ८० टक्के क्षेत्र पेरणीअभावी राहिले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात शेतीला पाणी देणे कठीण बनले आहे. बोर नदीचे पात्र ठणठणीत कोरडे पडले आहे. यामुळे पिके कशी जगवायची, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. खरीप हंगामा वाया गेला आहे. रब्बी हंगामही धोक्यात आहे. ऊस, बाजरी, मका, तूर ही पिके संपली आहेत. बोर नदीचे पात्र कोरडे पडल्याने आलेली पिकेही वाचवणे अशक्य झाले आहे.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वैरण नाही आणि ओला चारा नाही. अशा परिस्थितीमुळे जनावरे विकण्याची वेळ आली आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. तसेच चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Sangli: संखला बोर नदीचे पात्र कोरडे; खरीप पेरणी वाया, रब्बी हंगामही धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 5:49 PM