जत/माडग्याळ : दुष्काळामुळे साडेतीन एकर शेतजमिनीतून काहीच उत्पन्न न मिळाल्याने उटगी (ता. जत) येथील कर्जबाजारी शेतकरी लायाप्पा रायगोंडा इंचूर (वय ४५) यांनी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी लायाप्पा यांची पत्नी महानंदा इंचूर यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे.लायाप्पा इंचूर यांचे उटगी गावात घर आहे. तेथे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगी व तीन मुले असे कुटुंब आहे. उटगी ते सलगर (ता. मंगळवेढा) रस्त्यादरम्यान उटगीपासून तीन किलोमीटरवर त्यांची साडेतीन एकर शेतजमीन आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील कूपनलिका कोरडी पडली आहे. पावसाच्या भरवशावर त्यांनी दोन एकर क्षेत्रात तूर, तर दीड एकर क्षेत्रात रब्बी ज्वारीची पेरणी केली होती. महिन्यापूर्वी ते कर्नाटकातील रोन्याळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथील बसवेश्वर साखर कारखान्याकडून एक लाख रुपये उचल घेऊन ऊसतोडणी कामगार म्हणून गेले होते.ज्वारीचे पीक पूर्णपणे करपून गेल्यानंतर तुरीच्या काढणीसाठी दोन दिवसांपूर्वी ते उटगी (ता. जत) येथे आले होते. दोन एकरातून त्यांना केवळ २५ ते ३० किलो तुरीचे उत्पादन मिळाले. ज्या प्रमाणात खर्च केला, त्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्याने ते निराश होते.सोमवारी सकाळी त्यांनी पत्नी महानंदा हिला बसने उमदी (ता. जत) येथील बहिणीकडे पाठवून दिले. त्यानंतर ते शेताकडे एकटेच गेले. जमीन नापीक झाल्यामुळे व तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दुपारी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
उटगी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:05 AM