जयवंत आदाटे जत : जत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजना उधारीवर चालत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिने उलटून गेले तरीही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा संपूर्ण खर्च शाळेच्या मुख्याध्यापकांना करावा लागत आहे, तर बचत गटातील महिला उधार उसनवारीवर किराणा दुकानातून साहित्य आणून आहार वाटप करत आहेत.राज्याच्या शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त गावातील शाळांमधील वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी शाळेत नियमितपणे उपस्थित राहत नाहीत.त्यामुळे या नियमात बदल करून, शाळा सुरू झाल्यानंतर नियमित आहारास जोडून आठवड्यातून तीन दिवस पूरक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त गावातील वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध, फळे व अंडी असा पूरक आहार देण्यात येत आहे. यासाठी प्रतिदिन एका विद्यार्थ्यासाठी पाच रुपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे.शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून गेले तरी या योजनेचे अनुदान अद्याप दिले गेले नाही. त्यामुळे या संपूर्ण योजनेचा भार शाळेतील मुख्याध्यापकांच्या खिशावर पडत आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. योजना राबवली तर आर्थिक अडचण आणि नाही राबवली तर शासकीय अधिकाऱ्यांची दमदाटी अशा दुहेरी संकटात मुख्याध्यापक सापडले आहेत.बचत गटाला चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही, पूरक आहार योजना काही ठिकाणी बचत गटाकडून, तर काही ठिकाणी मुख्याध्यापकांकडून चालवली जात आहे. दोन महिन्यांपासून पूरक आहार योजनेचे मानधन मिळाले नाही, मार्च २०१९ पासून शालेय पोषण आहार शिजवण्याचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना उधार उसनवारीवर साहित्य आणून आहार शिजवून त्याचे वाटप करावे लागत आहे. जत तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या मराठी, कन्नड व उर्दू माध्यमातील ४४३ शाळा असून, तेथे एक हजार दोनशे शिक्षक कार्यरत आहेत.
पोषण आहार उधारीवर, तालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 3:27 PM
जत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजना उधारीवर चालत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिने उलटून गेले तरीही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा संपूर्ण खर्च शाळेच्या मुख्याध्यापकांना करावा लागत आहे, तर बचत गटातील महिला उधार उसनवारीवर किराणा दुकानातून साहित्य आणून आहार वाटप करत आहेत.
ठळक मुद्देपोषण आहार उधारीवरतालुक्यातील बचत गट आर्थिक अडचणीत