सांगली : पोलिसांच्या मारहाणीत मृत झालेल्या अनिकेत कोथळे याच्याविरुद्ध लुबाडणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्यामागे सांगलीतील व्यापारी नीलेश खत्री व मध्यस्थ गिरीश लोहाना यांचा हात आहे, असा आरोप अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले की, अनिकेत खासगी वाहनावर चालक होता. दिवाळीपूर्वी त्याने हे काम सोडले. तो हरभट रोडवरील नीलेश खत्री या व्यापाºयाच्या लकी बॅग हाऊसमध्ये नोकरीला लागला. पगारावरुन त्याचा खत्रीशी वाद झाला. त्यानंतर अनिकेतने गल्ल्यातील रोकड लंपास केल्याचा आरोप खत्री याने केला. त्याने पोलिसांना बोलावून घेतले. अनिकेतला पोलिस ठाण्यात नेले. त्यावेळी गिरीश लोहाना यांनी खत्री याची बाजू घेऊन, अनिकेतवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण यासंदर्भात कोणतेही पुरावे न मिळाल्याने हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आले होते. ४ नोव्हेंबरला (शनिवार) सायंकाळी सात वाजता हा प्रकार घडला होता. रविवारी दुसºयादिवशी अनिकेत घरी आलाच नाही. सोमवारी पहाटे पोलिसांनी आमच्या घरी फोन करून, अनिकेतला जबरी चोरीच्या गुन्'ात अटक केल्याची माहिती दिली.
ते म्हणाले की, आम्ही पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली. पण अनिकेतविरुद्ध कोणी फिर्याद दिली, याची विचारणा करुनही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. घाईगडबडीने त्याला अटक करुन तातडीने न्यायालयात उभे केले. पोलिस कोठडी मिळविण्यासाठी पोलिसांनीच वकील दिला. तीन दिवसांची पोलिस कोठडीही घेतली. त्याला जामीन मिळू नये, यासाठीच हे नियोजन केले होते. कामटे, त्याचे पथक, ठाणे अंमलदार, व्यापारी नीलेश खत्री व मध्यस्थ गिरीश लोहाना या सर्वांच्या संगनमतानेच अनिकेतचा घातपात झाला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडेही केली आहे.दीपाली काळे यांच्यासमोर घडली घटनाकोथळे म्हणाले की, कामटेने केलेले कृत्य पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्यासमोर घडले होते. पण त्यांनीही या कृत्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही चौकशी केल्यानंतर काळे यांनी, अनिकेत व त्याचा मित्र अमोल भंडारे पळून गेल्याची माहिती दिली. त्यांनी स्वत:ला वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. वरिष्ठ अधिकाºयांनाही हा प्रकार माहिती होता. पण तेही मूग गिळून गप्प होते.