सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाच्या ईव्हीएम मशीन व निवडणूक कागदपत्रे वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे दोन प्रकारच्या स्वतंत्र स्ट्राँग रूम करून ठेवल्या आहेत. ईव्हीएम व कागदपत्रे ठेवलेल्या दोन्हीही स्ट्राँगरूम सुरक्षित आहेत. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. तसेच स्ट्राँग रूमची उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसह पाहणीही केली आहे.डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँग रूम व निवडणूक कागदपत्रे ठेवलेली स्ट्राँग रुम, या प्रत्येक स्ट्राँगरूमला दोन ठिकाणी फायर अलार्म यंत्रणा बसविली आहे. एक गोदामाच्या आतील बाजूस व दुसरी गोदामाच्या बाहेरील भिंतीवर बसविली आहे. रविवारी पहाटे चारच्या दरम्यान निवडणूक कागदपत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूम बाहेरील भिंतीवरचा फायर अलार्म यंत्रणेमध्ये फॉल्स अलार्म झाल्याचे निर्दशनास आले. काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवेळी पावसामुळे फायर अलार्मची कंट्रोल पॅनल पत्र्याच्या पेटीमध्ये सुरक्षित ठेवलेली होती.त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे थेंब वाऱ्यामुळे गेल्याने फॉल्स अलार्म वाजत असल्याचे निदर्शनास आले होते. स्ट्राँग रूमच्या ठिकाणी नियुक्त असलेल्या फायर स्टाफ यांनी त्या ठिकाणी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. फायर अलार्म सिस्टीममध्ये फाॅल्स फायर अलार्म वाजल्याचे दिसून आले. हा अलार्म हा वादळी पावसाच्या पाण्याचे थेंब गेल्यामुळे वाजत होता. म्हणून तो बंद करण्यात आला. त्यामुळे स्ट्राँग रूम ठिकाणी भेट देण्यासाठी सर्व उमेदवारांना बोलविले होते.त्यानुसार सोमवारी सकाळी उमेदवार सुवर्णा गायकवाड, नानासो बंडगर व उमेदवार प्रतिनिधी संदीप पाटील, गजानन साळुंखे, आनंद रजपूत, दत्तात्रय पाटील यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. बाहेरील भिंतीवरील फायर अलार्म यंत्रणेमध्ये पावसाच्या वाऱ्याने बिघाड झाल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी आग सदृश कोणतीही परिस्थिती निर्दशनास आलेली नाही. निवडणूक कागदपत्र असलेल्या स्ट्राँगरूम, फायर अलार्म यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आली. उपस्थित उमेदवार व प्रतिनिधी यांच्या समक्ष झालेल्या सविस्तर चर्चेदरम्यान स्ट्राँग रूम उघडण्याची आवश्यकता नाही असे सर्वानुमते ठरविले.
सीआरपीएफ, एसआरपीएफसह पोलिसांचा बंदोबस्तउन्हाळी पावसापासूनच्या सुरक्षिततेच्या अतिरिक्त उपाय योजनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, अग्निशमन विभाग यांना सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर सीआरपीएफ, एसआरपीएफ व सांगली जिल्हा पोलिस यांचा पुरेसा बंदोबस्त स्ट्राॅंग रूमला ठेवला आहे, अशी माहितीही डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.