मिरज : इचलकरंजीतील सराईत गुन्हेगार योेगेश हणमंत शिंदे याचा मिरजेत खून करणाऱ्या सलीम ग्यासुद्दीन सय्यद (रा. उत्तमनगर, मिरज) व प्रकाश अनिल पवार (रा. प्रताप कॉलनी, मिरज) या दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दोघांचेही न्यायालयीन कोठडीत विलगीकरण करण्यात आले आहे.
रेल्वेत गोळ्या बिस्कीटे विक्रीतील दोनशे रुपये देण्या-घेण्याच्या वादातून दोघांनी सराईत गुन्हेगार योगेश शिंदे याच्या गळ्यावर हल्ला करून व गळा दाबून खून केला हाेता. याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी दोघांना काही तासातच अटक केली.
दोघांना मंगळवारी न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. आरोग्य तपासणीदरम्यान काेराेनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. त्यांच्या संपर्कात असलेले पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचीदेखील अँटिजन चाचणी करण्यात आली. मात्र सर्व अधिकारी, कर्मचारी निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
सय्यद व पवार या दोघांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल बुधवारी मिळणार आहे. खून प्रकरणातील दोन्ही संशयित कोरोना पॉझिटिव्ह असल्याने न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. काेठडीत त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.