सांगली : तुंग (ता. मिरज) येथील आनंदा हराळे या गुंडाचा खून करून गेल्या दोन दिवसांपासून फरारी असलेल्या भावांना गोटखिंडी फाट्यावर (ता. वाळवा) अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना शुक्रवारी रात्री यश आले. संपत दशरथ मलमे (वय २१) व धनाजी ऊर्फ लक्या वसंत मलमे (२३, दोघे रा. तुंग) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही चुलत भाऊ आहेत. दरम्यान, यामध्ये आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले असल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी सांगितले.आनंदा हराळे याचे संशयित संपत मलमे याची बहीण अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध होते. गतवर्षी तिचा विवाह झाला होता. त्यानंतरही या दोघांत अनैतिक संबंध सुरूच होते. तिने आनंदाकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. यातून आनंदाने तिच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. याप्रकरणी आनंदाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. तो गावात उजळमाथ्याने फिरत होता. यामुळे अर्चनाचे भाऊ संपत व धनाजी त्याच्यावर चिडून होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी आनंदाचा थरारक पाठलाग करुन निर्घृण खून केला होता. घटनेनंतर त्यांनी गावातून पलायन केले होते. त्यांचा शोध सुरू होता. शुक्रवारी रात्री ते गोटखिंडी फाट्यावर उभा असल्याची माहिती मिळताच निरीक्षक जाधव यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना पकडले. आज, शनिवार दुपारी त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खूनप्रकरणी दोघांना अटक
By admin | Published: December 14, 2014 12:39 AM