सांगली : येथील आपटा पोलीस चौकीजवळील हितेश जयंतीलाल पारेख (वय ४५) यांचा डोक्यात हातोडा घालून खून केल्याप्रकरणी त्यांचा सख्खा पूतण्या सूरज पारेख व त्याचा मित्र सौरभ कुकडे या दोघांना अटक केली आहे.
अवघ्या २४ तासात या खुनाचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले. हितेश पारेख यांनी सूरजला घरातून बाहेर काढले होते. त्यामुळे आता रहायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाल्याने सूरजने सौरभच्यामदतीने पारेख यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.मंगळवारी रात्री हितेश पारेख व त्यांची आई कमल पारेख (वय ८१) यांच्या डोक्यात हातोडा घालण्यात आला होता. दुसऱ्यादिवशी (बुधवार) सकाळी दहा वाजता हा प्रकार उघडकीस आला होता. कमल या बेशुद्ध होत्या, तर हितेश मरण पावले होते.
कमल यांना तातडीने उपचारासाठी हलविले. त्यांचा सायंकाळी जबाब नोंदवून घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे तपासाला योग्य दिशा मिळाली. संशयाची सूई सूरजकडे वळल्याने रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली.|सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तेंव्हापासून सूरज व त्याच्या बहिणीचा हितेश पारेख यांनी सांभाळ केला होता. बहिणीचे काही वर्षापूर्वी लग्न झाले आहे. सूरज हा हितेश आज्जी कमल पारेख यांच्याकडे आपटा पोलीस चौकीजवळ श्री अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक पाचमध्ये राहत होता.
तो काहीच कामधंदा करीत नाही. व्यसनाच्या आहारी गेला होता. मित्रांकडून ऊसने पैसे घेत असे. पैशावरुन त्याचे अनेकांशी भांडण झाले होते. ही भांडणे घरापर्यंत येत होती. त्यामुळे हितेश पारेख यांनी सूरजला अनेकदा खडसावले होते. तुझ्या वर्तणुकीत सुधारणा नाही झाली तर, तुला घरातून बाहेर काढणार, असे त्यांनी सांगितले होते. पण मात्र तरीही सूरजच्या वर्तणुकीत बदल झाला नाही.
गेल्या आठवड्यात हितेश पारेख यांनी सूरजला घरातून बाहेर काढले. याचा सूरजला राग आला. आता रहायचे कुठे? असा त्याला प्रश्न पडला. घरावर माझाही हक्क असताना मला बाहेर काढणारे हे कोण? असे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. यातून त्याने मित्र सौरभ कुकडे याची मदत हितेश पारेख यांचा खून केला. त्यानंतर आज्जी कमल पुढे आल्यानंतर त्यांच्याही डोक्यात हातोडा घातला होता.