कामेरी (ता. वाळवा) येथे बागडाचे पूजन करताना संग्राम पाटील, पुजारी अशोक निळकंठ, अशोक कुंभार, बंडा शेळके, आबा जाधव उपस्थित होते.
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील शुक्रवार, दि. २१ व शनिवार, दि. २२ मे रोजी होणारी ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा कोरोनामुळे यावर्षी भरविण्यात येणार नाही, अशी माहीत देवस्थान समितीचे विश्वस्त सुनील भीमराव पाटील यांनी दिली.
यात्रेची सुरुवात शुक्रवारी अक्षय्य तृतीयेला यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या बगाडाचे पूजन करून होते. आज प्रथेप्रमाणे पुजारी अशोक नीळकंठ यांनी बगाडाचे पूजन केले व संग्राम महादेव पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी संतोष चौगुले, कृष्णात जाधव, सतीश गायकवाड, अशोक कुंभार, बंडा शेळके, आबा जाधव उपस्थित होते.
प्रतिवर्षी या दिवशी बागडाचे पूजन करून रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीसाठी ते बाहेर काढले जाते. या बगाडाला ३ ते ५ बैल जोड्या जुंपून भैरवनाथ मंदिर ते हनुमान मंदिर अशा १० ते १२ फेऱ्या काढल्या जातात. हे धावते बगाड पाहण्यासाठी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने येतात. मात्र यावर्षी यात्रे दिवशी भैरवनाथ मंदिर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार बंद राहील. त्यामुळे दर्शनासाठी कोणीही गर्दी करू नये. गावातील वाढती कोरोना रुग्णसंख्या विचारात घेऊन कोणीही ग्रामस्थांनी पै -पाहुण्यांना यात्रेसाठी बोलवू नये, असे आवाहन देवस्थान समिती व कोरोना आपत्ती व्यवस्थापन समिती कामेरी यांचे वतीने करण्यात आले आहे.