सांगली : शहरातील सह्याद्रीनगर येथील क्रीडा मैदानावर फुटबॉल खेळत असताना जोरात मारलेला फुटबॉल लागून दुचाकीवरील दोघे जखमी झाले. याप्रकरणी श्रावणी लहू पवार (रा. मयूर काॅलनी, आरवाडे पार्क, सांगली) हिने अनिल पुजारी व अन्य एका मुलाविरोधात संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास सह्याद्रीनगर येथील दत्त मंदिरासमोरून फिर्यादी श्रावणी व तिचे वडील दुचाकीवरून जात होते. यावेळी तेथील मैदानावर फुटबॉल खेळणाऱ्या एका मुलाने फुटबॉल जोरात मारल्याने तो येऊन दुचाकीच्या चाकाला लागला. यात मोटारसायकल घसरून दोघेही खाली पडले. त्यात श्रावणी जखमी झाली, तर तिच्या वडिलांना कपाळास, नाकावर जखम झाली. तसेच दात घुसल्याने तोंडातही जखमी झाली. या अपघातात दुचाकीचेही २० हजारांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.