सांगली : शहरातील अतिथीगृह, प्रसुतिगृहाच्या जागेवर बीओटीतून व्यापारी संकुल उभे करण्याच्या निर्णयाला महापालिकेतील मदनभाऊ पाटील गटाने विरोध करण्याचा निर्धार केला आहे. येत्या २ नोव्हेंबर रोजीच्या महासभेत ऐनवेळी बीओटीचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. तत्पूर्वी पक्षबैठकीतच हा विषय हाणून पाडला जाईल. बीओटी करण्यास विरोध नसला तरी, ही योग्य वेळ नसल्याचे कारण मदनभाऊ गटाकडून दिले जात आहे. शहरातील अतिथीगृह, सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहासह जयश्री चित्रमंदिराशेजारील पार्किंगच्या जागेवर बीओटी अथवा पीपीपीतून व्यापारी संकुल उभे करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी महापौर विवेक कांबळे आग्रही आहेत. त्यासाठी अतिथीगृहाच्या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिटही करण्यात आले. ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल पॅनेलवरील आर्किटेक्ट यांनी दिल्यानंतर इमारत पाडण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. सुरूवातीला अतिथीगृहाच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव होता. आता त्यात प्रसुतिगृहाच्या जागेचाही समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही जागांसोबतच आता जयश्री टॉकीजच्या जागेचाही प्रस्ताव पुढे आला आहे. दरम्यान, येत्या २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत बीओटीवर शिक्कामोर्तब करण्याच्या हालचाली होत्या. त्यासाठी महापौरांकडून आग्रही भूमिका घेतली होती. तत्पूर्वीच सत्ताधारी गटाचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे दि. २ रोजीच्या महासभेत मदनभाऊंचे स्मारक, पुतळा उभारणीचा विषय अजेंड्यावर घेण्याचा निर्णय झाला. स्मारक व पुतळा उभारणीला महासभेची मान्यता घेतली जाणार आहे. याच सभेत बीओटीचा विषय कशासाठी? असा प्रश्न काँग्रेसच्या एका गटाकडून विचारला जात आहे. त्यात महासभेचे विषयपत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात बीओटीचा विषय नाही. ऐनवेळच्या विषयात बीओटीला मान्यता घेण्याचा महापौरांचा प्रयत्न आहे. पण त्याला काँग्रेसमधूनच विरोध होऊ लागला आहे. महासभेपूर्वी होणाऱ्या पक्षबैठकीत मदनभाऊ गटाचे नगरसेवक या विषयाला कडाडून विरोध करणार आहेत. (प्रतिनिधी)
बीओटीला मदनभाऊ गटाचा विरोध
By admin | Published: October 26, 2015 11:54 PM