कुंडल : पुणदी (ता. पलूस) येथे घराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळत असताना अचानक ट्रॅक्टर जागेवरून पुढे आल्याने, प्रथमेश उमेश शेळके या आठ वर्षांच्या मुलाचा ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. याबाबत संजय निवृत्ती शेळके यांनी कुंडल पोलिसांत फिर्याद दिली आहे.पुणदीतील लोककल्याण पतसंस्थेशेजारी शेळके कुटुंबीयांचे घर आहे. घरी आजी, आजोबा, आई, लहान बहीण असे कुटुंब असून, वडील उमेश शेळके यांचा दोन वर्षांपूर्वी दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे. प्रथमेश येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयात शिकत होता. रविवारी सकाळपासून तो मित्रांबरोबर खेळत होता. दुपारी आई शुभांगी यांनी त्याला घरी जेवण्यासाठी बोलावून घेतले. जेवण झाल्यावर शुभांगी यांनी त्याला शेजारी मोहन यादव यांच्या घरी गेलेल्या आजीस बोलावून आणायला सांगितले. यादव यांच्या घरासमोर गावातीलच पोपट जाधव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर उभा होता. आजीला हाक मारून प्रथमेश या ट्रॅक्टरवर चढला. ट्रॅक्टरमध्ये बसून तो स्टेअरिंग, अॅक्सिलेटर, गीअर शाफ्टसह खेळू लागला. खेळता-खेळता त्याने गीअर शाफ्ट न्यूट्रल केल्याने ट्रॅक्टर पुढे सरकू लागला. हे पाहून प्रथमेश घाबरला. काही कळण्यापूर्वीच जिवाच्या आकांताने त्याने ट्रॅक्टरवरून खाली उडी मारली. तो जमिनीवर पडताच ट्रॅक्टरचे मागील चाक त्याच्या अंगावरून गेले. पुढे निघालेला ट्रॅक्टर पाहून व प्रथमेशचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली; पण तोपर्यंत प्रथमेशच्या अंगावरून ट्रॅक्टर पुढे गेला होता. डोक्याला मार लागल्याने आणि अंगावरून चाक गेल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली होती. ग्रामस्थांनी तत्काळ त्याला उपचारासाठी हलविले; परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. प्रथमेशच्या अपघाती मृत्यूने पुणदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पलूस ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.दोन वर्षांपूर्वी वडिलांचा अपघाती मृत्यूप्रथमेशचे वडील उमेश शेळके यांचा दोन वर्षांपूर्वी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. आता प्रथमेशच्या अपघाती मृत्यूने आई शुभांगी, लहान बहीण राधा, आजोबा माजी सैनिक विलास शेळके, आजी आशाताई यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पुणदीत ट्रॅक्टरखाली सापडून मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:04 AM