सांगली : सत्ताधारी कॉँग्रेसमधील गटबाजीचे प्रदर्शन शनिवारी महापालिकेच्या सभेत प्रकर्षाने दिसून आले. प्रत्येक प्रश्नावर एकमेकांवर टीका करताना कुरघोड्यांचे राजकारण करण्यात काँग्रेसच्या सदस्यांनी धन्यता मानली. उपमहापौर विजय घाडगे यांनी कुपवाडमधील प्रश्नांवर नाराजीचे कारण देत थेट पीठासनावरच बहिष्कार टाकून सदस्यांमध्ये बसणे पसंत केले. महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजीला आता उघड होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे बंधन राहिले नाही. महापालिकेच्या सभांमध्ये आता सर्रास गटबाजीचे दर्शन घडविले जात आहे. शनिवारच्या महासभेत या गोष्टी स्पष्टपणे दिसून आल्या. विशाल पाटील यांच्या गटाने महापौर गटाशी सुरू केलेला संघर्ष महासभेतही कायम आहे. परंपरेप्रमाणे पीठासनावर महापौर, उपमहापौर, आयुक्त, नगरसचिव यांची आसनव्यवस्था करण्यात येते. परंपरेला छेद देत यंदा प्रथमच उपमहापौरांनी पीठासनाचा त्याग केला. पीठासनावर त्यांची खुर्चीही ठेवण्यात आली नाही. सदस्यांमध्ये बसूनच उपमहापौर विजय घाडगे प्रश्न उपस्थित करीत होते. विरोधी गटातील विष्णू माने यांनी उपमहापौर पीठासनावर का नाहीत, असा सवाल केला. उपमहापौरांनी राजीनामा दिला असेल, तर तसे जाहीर करा, अशी मागणीही केली. हा विषय अधिक ताणला जात असल्याचे लक्षात येताच महापौरांनी यावर खुलासा केला. उपमहापौरांना यावेळी अडचण आहे, पुढील वेळेत ते नक्की पीठासनावर दिसतील, असे स्पष्टीकरण दिले. सत्ताधारी गटाचे नेते किशोर जामदार यांनीही या प्रश्नावर छेडले. महापौर आणि आयुक्तांचेच नेहमी गुफ्तगू चालत असल्यामुळे उपमहापौर नाराज होऊन बहुधा खाली आले असावेत, अशी टिप्पणी केली. सभेत सत्ताधारी सदस्यांनी एकमेकांशी भांडण्यात धन्यता मानली. सभेचे विषयपत्र वाचन सुरू होण्यापूर्वीच शेखर माने आणि महापौर शिकलगार यांच्यात जुगलबंदी रंगली. शेखर माने यांनी पाणी आणि ड्रेनेजच्या प्रलंबित कामांची दुखरी नस दाबल्यामुळे महापौर गटातील सदस्यांचे चेहरे पडले. दुसरीकडे माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी वसंतदादा कारखान्याला लक्ष करून माने यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. दोन गटात जुगलबंदी चालू असतानाच कधी मजलेकर-किशोर जामदार यांच्यात, तर कधी मजलेकर आणि महापौरांमध्ये वाद निर्माण झाले. संतोष पाटील आणि सुरेश आवटी यांनीही एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. अनेक गटांमध्ये विखुरलेली काँग्रेस महासभेत दिसून आली. सत्ताधारी गटाचेच माजी महापौर विवेक कांबळे यांनी या महासभेला थेट भाजी मंडईची उपमा देऊन स्वकीयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (प्रतिनिधी) गाडगीळांचे श्रेय : सदस्यांमध्ये वाद... रस्ते अनुदानाबाबत सुधीर गाडगीळ यांनी प्रयत्न केल्यामुळे महापालिकेला तीन कोटी रुपये मिळाल्याची बाब सुरेश आवटी यांनी उपस्थित केली. त्यानंतर संतोष पाटील यांनी हा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. गाडगीळांचा यामध्ये काहीही संबंध नाही. याऊलट राजकारण करून महापालिकेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाल्याची माहिती दिली. आवटी यांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगून गाडगीळांना या गोष्टीचे श्रेय दिलेच पाहिजे, असे मत मांडले. मिरजेतील ड्रेनेजचा प्रश्न गाजला मिरजेतील ड्रेनेजप्रश्नी संगीता हारगे यांनी प्रश्न उपस्थित केला. पंचशीलनगर ते शास्त्री चौक या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती केल्यास मिरजेतील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे मत त्यांनी मांडले. त्याच अनुषंगाने संजय मेंढे यांनीही आक्रमकपणे या लाईनची दुरुस्ती करण्याची मागणी केली. जुनी ड्रेनेज लाईन अरुंद झाल्याने अनेक भागांमध्ये बॅकवॉटरचा त्रास सुरू झाला आहे. नागरिकांनी याबाबत जाब विचारल्याची माहितीही सदस्यांनी सभागृहात दिली.
उपमहापौरांचा पीठासनावरच बहिष्कार
By admin | Published: October 15, 2016 11:25 PM