सांगली : जिल्हा परिषदेच्या सरपंच कार्यशाळेवर खुद्द अध्यक्ष-उपाध्यक्षांनीच बहिष्कार टाकला. भाजपच्या काही सदस्यांनीही पाठ फिरविली. कार्यशाळेला जयंत पाटील असल्याने बहिष्काराचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता.कोरोना विषयावर मंगळवारी कार्यशाळा व आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रम झाला. पाटील यांच्यासह कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुमन पाटील आदी उपस्थित होते. मात्र अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्यासह भाजपचे विषय सभापती व सदस्य गैरहजर राहिले.
कार्यक्रम पत्रिकेवर उल्लेख होता, शिवाय डिजीटलवर अग्रक्रमाने नावे होती, तरीही त्यांना पाठ फिरविली. अजितराव घोरपडे गटाच्या आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील तसेच भाजपचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, सरीता कोरबू, मनोज मंडगनूर, अरुण बालटे, सरदार पटेल, संपतराव देशमुख हे मात्र उपस्थित होते.
भाजप पदाधिकार्यांच्या अनुपस्थिची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. खुद्द जयंत पाटील यांनीही भाषणादरम्यान दखल घेतली. कार्यक्रमाला अनुपस्थित असणार्या अध्यक्षा कोरे यांचेही आभार असे वक्तव्य केले.ते म्हणाले की, कार्यक्रमात अध्यक्षांसह सदस्यांची भेट होण्याची अपेक्षा होती. जिल्हा परिषदेचे प्रश्न समजले असते. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली असती. पण सदस्य भेटले नाहीत. मला जिल्हा परिषदेत जायचेच आहे, तुम्ही बोलवाल तेव्हा येईन असा टोलाही त्यांनी मारला.महापालिकेत भाजपची सत्ता पाटील यांनी उलथवली आहे. जिल्हा परिषदेतही पदाधिकारी बदलाचे वारे वाहत असून जयंत पाटील येथेही गडबड करतील अशी भाजप नेत्यांना भिती आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा परिषदेत यायचे आहे असे वक्तव्य केल्याने सदस्यांमध्ये हशा पिकला.महापालिकेतील सत्ताकारणामुळे दांडीपाटील यांनी महापालिकेत भाजपला पायऊतार केल्याने भाजप श्रेष्ठींनी आजच्या कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या व महापालिकेच्या कार्यक्रमाला भाजप सदस्य गैरहजर राहिले. जिल्हा परिषदेतील बदलाला अनुकूल भाजप सदस्यच उपस्थित होते.