अविनाश कोळी - सांगली -महापालिका आणि एचसीएल कंपनीमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे महापालिका प्रशासनाची अनेक स्तरावर गोची झाली आहे. महसुली विभागांना फटका बसला असतानाच, आता महापालिकेचे संकेतस्थळही गायब झाले आहे. ई-टेंडर, ई-गव्हर्नन्स यासह अनेक आॅनलाईन गोष्टींचे वांदे निर्माण झाल्याने प्रशासकीय चिंता वाढली आहे. सहा वर्षांपूर्वी एचसीएल कंपनीशी झालेल्या करारानंतर सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या संकेतस्थळाला मुहूर्त लागला. एचसीएलच्या स्वतंत्र सर्व्हरवरून संकेतस्थळाने ई-गव्हर्नन्समध्ये अनेक गोष्टी साध्य केल्या. ई-टेंडरची प्रक्रियाही सुरू झाली. महाआघाडीच्या कालावधित या कंपनीशी याबाबतचा करार झाला होता. संकेतस्थळासहीत महापालिकेच्या महसुली विभागांची बिले, दाखले आणि संगणकीय यंत्रणा अद्ययावत करणे याबाबत करारात उल्लेख आहे. त्यानुसार ई-गव्हर्नन्सची प्रक्रिया सुरू झाली. महापालिकेच्या या आॅनलाईन अस्तित्वाला सत्ताबदलानंतर धक्का बसला. महाआघाडीने केलेल्या ई-गव्हर्नन्स करारामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मुद्दे मांडून काँग्रेसने अनेकदा आंदोलने केली होती. सत्तेवर आल्यानंतर महापालिकेची होणारी लूट थांबविण्याबाबतची आश्वासने निवडणुकीच्या सभांमधून देण्यात आली होती. २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसला याठिकाणी सत्ता मिळाली. त्यामुळे काँग्रेसने पहिला धक्का एचसीएलला दिला. महापालिका सभेतच कंपनीच्या करारभंगावर टीका करून त्यांची बिले थांबविण्याबाबतचे आदेश देण्यात आले. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला. सर्व्हर कंपनीच्याच ताब्यात असल्यामुळे महापालिकेचे आॅनलाईन अस्तित्व संपुष्टात आले. आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्याने यंदा महापालिकेने डायऱ्या छापल्या नाहीत. दुसरीकडे संकेतस्थळही बंद पडले आहे. त्यामुळे महापालिकेबाबतची माहिती मिळविण्यासाठी महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागतात. पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, प्रभाग समित्या, त्यांच्या जबाबदाऱ्या यांच्या नोंदी थेट महापालिकेत येऊन पाहाव्या लागत आहेत.संकेतस्थळाबाबतच्या नोंदीमहापालिकेच्या संकेतस्थळाचा जागतिक क्रमांक ३७ लाख ६८ हजार ५९ वा आहे. या संकेतस्थळावरील पेज पाहणाऱ्यांची प्रत्येक महिन्याची संख्या सरासरी ९०७२ इतकी आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी २ हजार २६८ लोक या संकेतस्थळाला भेट देत होते. २८ जानेवारी २०१४ ला या संकेतस्थळावर शेवटचे अपडेट (सुधारणा) करण्यात आली होती. त्यानंतर हे संकेतस्थळ बंद करण्यात आले. याच संकेतस्थळावर इकोसिटीसह अन्य २५ लिंक उपलब्ध करण्यात आल्या होत्या.
महापालिकेच्या आॅनलाईन कारभाराला लागला ‘ब्रेक’
By admin | Published: November 05, 2014 10:22 PM