दत्ता पाटील-- तासगाव --तासगाव तालुक्याला मंत्रीपद तसे नवखे नाही. मात्र भाजपचे सरकार आल्यानंतर तालुक्याला मंत्रिपदाची पोकळी जाणवू लागली. खासदार संजयकाकांनी ही पोकळी भरुन काढण्यासाठी तालुक्यात मंत्र्यांची हजेरी लावण्यासाठी वजन दाखवून दिले. मात्र ग्रामविकासमंत्री, जलसंपदामंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या दोन दिवसातील दौऱ्यातून केवळ शासन निर्णयाचे ब्रॅन्डींगच केल्याचे दिसून आले. तालुक्यातील दुष्काळ, रखडलेल्या पाणी योजनांच्याबाबतीत एकाही मंत्र्याकडून आश्वासक निर्णय जाहीर झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेचा भ्रमनिरास तर झालाच, किंंबहुना मंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचे लॅन्डिंग झाल्याचे चित्र दिसून आले.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे सलग पंधरा वर्षे मंत्रीपद होते. नेहमीच सत्तेवर असणाऱ्या या तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाची धुरा संजयकाकांकडे आली. खासदार पाटील यांनीही शासनदरबारी आपले वजन वापरून तालुक्याच्या, मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्र्यांना तासगावात येण्याचे आवाहन केले. संजयकाकांच्या आग्रहामुळे गुरुवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सावळज येथील सरपंच परिषदेला हजेरी लावली, तर शुक्रवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळा भूमिपूजनाच्या निमित्ताने जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली.भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा सहा महिन्यात तासगावचा हा दुसरा दौरा. ग्रामविकासमंत्री, जलसपंदामंत्र्यांचा हा पहिलाच दौरा झाला. तालुक्यात रखडलेल्या पाणी योजनांसाठी निधीचा प्रश्न आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न भेडसावत आहे. अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र मंत्र्यांच्या दौऱ्यात या समस्यांबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही. बहुतांश नेत्यांनी तालुक्यातील समस्याच बेदखल केल्याचे दिसून आले. पंकजा मुंडे यांनी सावळज दौऱ्यात ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांचे ब्रॅन्डींग केले. सरकारने किती लोकहिताचे निर्णय घेतले, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. जाता-जाता दोन वर्षात राज्यातील दुष्काळ संपवू, असे आश्वासनाचे गाजर दाखवले, इतकाच काय तो दिलासा. मंत्र्यांचे दौरे हे शासनाच्या कँपेनिंगसाठी होते, की दुष्काळग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.शासन दरबारी दाखवले वजनसंजयकाकांनी तालुक्यात मंत्र्यांना आणून, शासनदरबारी असलेले वजन दाखवून दिले. जनतेची दुष्काळाची वेदना सावळजच्या जाहीर सभेत ग्रामविकास मंत्र्यांच्या कानावर घातली. तासगाव येथील कार्यक्रमातदेखील जलसंपदामंत्र्यांकडून जनतेच्या अपेक्षा असल्याची भावना व्यक्त केली. मात्र दोन्ही ठिकाणी मंत्र्यांकडून तालुक्याच्या प्रश्नांची दखल घेतली गेलीच नाही.
मंत्र्यांचे दौऱ्यातून ब्रॅन्डिंग; लोकांच्या अपेक्षांचे लॅन्डिंग
By admin | Published: April 24, 2016 11:04 PM