विटा : गेल्या वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि विटा नगरपरिषदेने शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई जागेत नव्याने बांधलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची उद्या मंगळवारी (दि. १६ डिसेंबर) रोजी होणारी लिलाव प्रक्रिया प्रभाग क्र. ६ मधील पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून विटेकरांच्या चर्चेत असलेला हा वादग्रस्त विषय पुन्हा एकदा असाच चर्चेत राहणार आहे. विटा नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असली तरी, आता सध्या तरी या प्रक्रियेला दीड महिन्याचा ब्रेक लागला आहे.विटा नगरपरिषदेने शिवाजी चौक व जुनी भाजी मंडईच्या सि. स. नं. ७, १३ व १४ या जागेत नव्याने शॉपिंग सेंटरची उभारणी केली आहे. यातील गाळे व्यापाऱ्यांना देण्या-घेण्यावरून पालिका प्रशासन, सत्ताधारी व विरोधक असा गेल्या एक ते दीड वर्षापासून संघर्ष सुरू होता. सत्ताधारी गट व प्रशासनाने ३१ गाळेधारकांना दिलेला ताबा अनधिकृत व बेकायदेशीर असल्याचा दावा करीत विरोधी गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील गाळेवाटप प्रक्रियेला स्थगिती दिली होती.त्यानंतर सत्ताधारी व प्रशासनाने या निर्णयाविरूध्द पुणे आयुक्तांकडे अपील दाखल केले. परंतु, ते अपीलही फेटाळून आयुक्तांनी गाळ्यांचा रितसर लिलाव करून गाळे वाटप करण्याचा आदेश दिला. त्यानुसार कौन्सिल सभेत याबाबत बरीच वादळी चर्चा झाल्यानंतर येथील गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया उद्या, मंगळवारी (दि. १६) रोजी होणार होती. मात्र, नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ मधील एका जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, या पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यामुळे उद्या, मंगळवारी होणाऱ्या गाळे लिलाव प्रक्रियेस आचारसंहितेमुळे ‘ब्रेक’ लागला आहे. दि. २० जानेवारीनंतर म्हणजे आचारसंहितेनतर लिलाव होतील. (वार्ताहर)
विट्यात गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेस ‘ब्रेक’
By admin | Published: December 15, 2014 10:40 PM