नरवाड : म्हैसाळ उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मिरज-कवठेमहांकाळ तालुक्यांत निकृष्ट कामामुळे अनेक भगदाड पडली असतानाही पाटबंधारे खात्याने गांधारीची भूमिका घेतली आहे.म्हैसाळ प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनपासून मुख्य कालव्याद्वारे सहा टप्प्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. जागोजागी पाणी उचलून पुढे नेण्यात आले आहे. १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी म्हैसाळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी केवळ ८२ कोटी रुपये संबंधित प्रकल्प पूर्णत्वासाठी मंजूर झाले होते. त्यानंतर ही योजना रखडत जाऊन योजनेचा खर्च ९६४ कोटीवर जाऊन पोहोचला. यातून ३४१ कि.मी. कालव्याची खुदाई करुन बांधकाम तसेच पंपगृह, विद्युत मोटारी आदींवर खर्च करण्यात आला. कालांतराने जल आयोगाची मान्यता मिळाल्याने म्हैसाळ प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे गेली.मात्र सद्य:स्थितीत म्हैसाळ प्रकल्पाची अवस्था दिवसेंदिवस वाईट होऊ लागली आहे. दुसऱ्या टप्प्यापासून मुख्य कालव्याने पाणी वाहण्यासाठी तयार केलेल्या कालव्याला भगदाड पडू लागली आहेत. पाटबंधारे खात्याने ठेकेदारांवर कोणतेही नियंत्रण ठेवले नसल्याने बांधकामाचा बोजवारा उडाला आहे.मुख्य कालव्याला अत्यल्प प्रमाणात सिमेंटचा वापर केला गेल्याचे पितळ उघडे पडू लागले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या वितरण हौदालगतच मोठी भगदाडे पडू लागली आहेत. भविष्यात मुख्य कालवाच पाण्याने वाहून जाण्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.परिणामी, दुसऱ्या टप्प्यातून वाहणाऱ्या पाण्याची अखेर टप्प्याशी मोजदाद केल्यास, कवठेमहांकाळच्या ग्रामस्थांना म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी मृगजळ ठरणार आहे. (वार्ताहर)++सिमेंटचा अल्प प्रमाणात वापरप्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनपासून मुख्य कालव्याद्वारे सहा टप्प्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी नेण्याची व्यवस्था केली आहे.सुमारे ३४१ कि.मी. कालव्याची खुदाई करुन बांधकाम तसेच पंपगृह, विद्युत मोटारी आदींवर खर्च करण्यात आला. मात्र दुसऱ्या टप्प्यापासून मुख्य कालव्याने पाणी वाहण्यासाठी तयार केलेल्या कालव्याला सिमेंटचा अत्यल्प प्रमाणात वापर केल्याने अनेक भगदाड पडले आहेत. यामुळे मुख्य कालवाच पाण्याने वाहून जाण्याची शक्यता आहे.
‘म्हैसाळ’ प्रकल्पाला दुसऱ्या टप्प्यात भगदाड
By admin | Published: January 12, 2015 11:17 PM