मिरज बसस्थानकामध्ये स्वच्छतेची मागणी
मिरज : शहरातील बसस्थानकामध्ये प्रवाशांची रहदारी वाढत आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यामुळे बसस्थानक परिसरात स्वच्छतेसह कोरोनाबाबत सुरक्षेसाठी सर्व बाबींची खबरदारी घेतली जावी, अशी मागणी होत आहे.
कोरोना लसीबाबत जनजागृतीची गरज
जत : जत तालुक्यात सध्या कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही गैरसमजांमुळे ते लसीकरणासाठी पुढे येत नाहीत. यामुळे कोरोना लसीकरणाबाबत ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
वीज पुरवठा खंडितच्या नोटिसा
करगणी : आटपाडी तालुक्यातील वीज ग्राहकांना वीज बिल वसुलीसाठी महावितरणच्या कार्यालयातून वीज पुरवठा खंडित करण्याच्या नाेटिसा देण्यात येत आहेत. काेराेना व लॉकडाऊनमुळे एकीकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असताना अशा नाेटिसांमुळे वीज ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. यामुळे महावितरणने वीज बिलांची सक्ती न करता थकीत वीज बिलाचे हप्ते ठरवून ते भरण्यासाठी याेग्य ती मुदत द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून करण्यात येत आहे.
चरण परिसरात शेतीच्या मशागती
चरण : शिराळा तालुक्यातील चरण परिसरात शेतीच्या मशागतींच्या कामांनी वेग घेतला आहे. मशागतीच्या खर्चात एकरी सुमारे ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. आधीच शेतमालाच्या उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात आहे. त्यातच शेतीच्या मशागतीत दरवाढ झाल्याने शेतकरी विवंचनेत आहेत.
डासांचा उपद्रव वाढला
कुपवाड : कुपवाड शहर व उपनगरांमध्ये दोन वादळी पाऊस झाल्यामुळे पाणी साचून राहिले आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. महापालिकेने शहरात धूर फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी हाेत आहे.
पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा
कवठेमहांकाळ : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक, तसेच कॉम्प्लेक्समधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. या भुरट्या चोरट्यांवर कारवाईची नागरिकांनी मागणी केली आहे.
सांगलीतील बायपास रस्त्यावरच कचरा
सांगली : सांगलीतील बायपास रस्त्यावरच काही हॉटेल व्यावसायिक कचरा टाकत आहेत. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कलानगरमधील नाल्यांचा उपसा वेळेवर होत नाही. घाणीमुळे रोगराई पसरू शकते. डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.