प्रताप महाडीककडेगाव : कडेगाव तालुक्यात भ्रष्ट सरकारी बाबूंनी अक्षरश: थैमान घातले आहे. एकामागून एक भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे येत आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया होत आहेत. मात्र तरीही भ्रष्टाचार थांबता थांबत नाही. दोन दिवसांपूर्वी कडेगाव जिल्हा सांगली येथील आर.टी.ओ कॅम्पमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली पासिंग करून देणेसाठी शिवाजीनगर तालुका कडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांना आर.टी.ओ कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत असलेल्या व्यक्तीने १० हजार रुपयांची लाच मागितली. यामुळे भ्रष्टाचाराला वैतागून मांडवे यांनी कपडे काढून देत संताप व्यक्त केला.आरटीओ कार्यालयाकडून तालुकानिहाय कॅम्पचे आयोजन केले जाते. यानुसार दोन दिवसांपूर्वी कडेगाव येथे आरटीओ कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कॅम्प सुरू होता. यावेळी प्रमोद मांडवे हे त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीची ट्रॉली पासिंग करून घेण्यासाठी गेले होते. प्रमोद मांडवे यांनी कोणत्याही एजंटला मध्यस्थी न घालता स्वतः कागदपत्रांची जुळवाजुळव केली होती.यावेळी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत असलेल्या व्यक्तीने मांडवे यांचेकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. यामुळे भ्रष्ट कारभाराचा संताप व्यक्त मांडवे यांनी चक्क अंगावरचे कपडे काढून दिले. माझे कपडे घ्या, पण माझं काम करा असे बोलत त्यांनी भ्रष्ट सरकारी व्यवस्थेबद्धल नाराजी व्यक्त केली.भ्रष्टाचाराविरोधात घोषणाबाजीप्रमोद मांडवे यांनी कपडे काढून देत आर.टी.ओ कार्यलायातील भ्रष्टाचारावर संताप व्यक्त केला. यानंतर काही वेळाने आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, वंचितचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय माळी यांच्यासह तालुक्यातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन भ्रष्ट आरटीओ अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
ट्रॅक्टर ट्रॉली पासिंग करून देण्यासाठी मागितली लाच, त्याने केलं अस काही की सारेच झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 3:34 PM