शिराळा : चिखली (ता. शिराळा) येथील ऊस तोडणी मालकाकडे मजूर पुरवठा करतो, असे सांगून दोघांनी १७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी श्रीकांत पोपट मगदूम यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून महादेव अन्यादा पाटील (रा. लिंगीवरे, ता. आटपाडी) व बाळू सदाशिव रणदिवे (रा, दिघंची ता. आटपाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत मगदूम यांच्या मालकीची ट्रॅक्टर व ट्रॉली ही वाहने आहेत. त्यांनी साखर कारखान्यासाठी ऊसतोडणी व वाहतुकीकरिता करार केला होता. यामुळे मगदूम यांनी महादेव अन्यादा पाटील व बाळू सदाशिव रणदिवे यांनी प्रत्येकी २० मजूर पुरविण्यासाठी दि. १३ जुलै २०२० रोजी ॲडव्हान्स म्हणून दोघांना प्रत्येकी ८ लाख ५० हजार रुपये असे एकूण १७ लाख रुपये दिले होते; मात्र या दोघांनीही ऊसतोड कामगार दिले नाहीत. रक्कमही परत केली नाही. यामुळे आपली महादेव अन्यादा पाटील व बाळू सदाशिव रणदिवे यांनी फसवणूक केली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पुढील तपास कैलास गावडे करीत आहेत.