इस्लामपूर : शेतीपंपाचे वीज बिल कमी करण्यासाठी शेतकर्याकडून एक हजाराची लाच घेताना ‘महावितरण’च्या कनिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. शिवाजी रंगराव पाटील (वय ३९, रा. इटकरे, ता. वाळवा) असे त्याचे नाव आहे. येथील वीज मंडळाच्या उपविभागीय कार्यालय क्रमांक २ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. आज, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या कारवाईने शहरात खळबळ माजली होती. पाटील याला अटक केल्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १२ हजारांची रोकडही मिळाली. तिचाही पंचनामा केला. शिवाजी पाटील याने ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील शेतकर्याकडे शेतीपंपाचे वीज बिल कमी करण्यासाठी हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर संबंधित शेतकर्याने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. यानुसार शिवाजी पाटीलने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यावर आज कार्यालयाजवळ सापळा लावला. पाटील कार्यालयात आल्यानंतर त्याने या शेतकर्याकडून एक हजार रुपयांची लाच घेतली. तेव्हाच ‘लाचलुचपत प्रतिबंधक’च्या पथकाने त्याला पकडले. या विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांनी शासकीय कर्मचार्यांनी लाचेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले . (वार्ताहर) अनुकंपा तत्त्वावर नोकरी महावितरणच्या सेवेत असताना शिवाजीचे वडील रंगराव पाटील यांचा विजेच्या खांबावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शिवाजी वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सेवेत रुजू झाला होता. आज केवळ एक हजार रुपयांच्या लालसेपोटी त्याच्याकडून लाच स्वीकारण्याचे कृत्य घडले आणि त्याच्यावर कोठडीत जाऊन बसण्याची वेळ आली.
महावितरणच्या लाचखोर लिपिकाला अटक
By admin | Published: May 22, 2014 12:41 AM