मिरज : मिरजेत झोपडपट्टी धारकांना वीज पुरवठ्यासाठी मीटर बसवून देण्याकरिता तीन हजाराची लाच मागितल्याच्या कारणावरून मिरज महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता महंमदइलियास याकुब मोमीन (वय ३५, रा. सुभाषनगर, मिरज) याच्यासह त्याच्या खासगी एजंटास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत मिरजेतील इंदिरानगर येथे बांधण्यात आलेल्या इमारतीतील सुमारे २५ घरात विजेचे मीटर बसवून देण्यासाठी सहाय्यक अभियंता महंमदइलियास मोमीन याने पप्पू ऊर्फ जोतिराम महादेव तोरसकर (३८, रा. शनिवार पेठ, मिरज) याच्यामार्फत पाच हजाराची मागणी केली होती. तडजोडीने तीन हजार रूपयात सौदा ठरविण्यात आला.
याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर मोमीन यास पकडण्यासाठी दोनवेळा सापळा लावण्यात आला. मात्र मोमीन यास संशय आल्याने त्याने व तोरसकर याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. मात्र मोमीन व तोरसकर यांनी लाचेची मागणी केल्याचे दूरध्वनीवरील संभाषणातून निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
पोलीस उपअधीक्षक राजेंद्र तेंडुलकर, निरीक्षक बयाजी कुरळे, कर्मचारी अविनाश सागर, सुनील कदम, संजय संकपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.सुभाषनगर येथे घरावर छापालाच मागितल्याच्या कारणावरून सहाय्यक अभियंत्यास अटक झाल्याने महावितरण कार्यालयात खळबळ उडाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मोमीन याच्या सुभाषनगर येथील घरावर छापा टाकून तपासणी केली. मोमीन याच्या आणखी एका एजंटास महिन्यापूर्वी लाच मागितल्याच्या कारणावरून ‘लाचलुचपत’च्या विभागाने अटक केली असून या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहेत.