दिलीप मोहिते - विटा -राज्य उत्पादन शुल्कच्या विटा विभागातील अतिरिक्त निरीक्षक पदाचा कार्यभार पदरात पाडून घेऊन ‘तोडपाणी’च्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करणारा व मंगळवारी आमणापूर येथे लाचलुचपतच्या जाळ्यात अलगद सापडलेला विट्यातील उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त निरीक्षक व तासगावचा दुय्यम निरीक्षक लाचखोर मनोज मधुकर संबोधी यास राजकीय आशीर्वादाने मोठी शक्ती मिळाली असल्याची चर्चा आहे. गेल्या सव्वा वर्षापासून विटा उत्पादन शुल्क विभागात रिक्त असलेली निरीक्षक पदाची खुर्ची लाचखोर ‘संबोधी’मुळेच आजही रिकामी असल्याचे समजते. त्यामुळे राजकीय वरदहस्त लाभलेल्या संबोधी या दुय्यम निरीक्षकाचा कॉन्स्टेबल ते दुय्यम निरीक्षक आणि अतिरिक्त निरीक्षकपर्यंतचा प्रवास थक्क करणाराच ठरत आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सेवेत असलेले वडील मधुकर यांच्या निधनानंतर अनुकंपाखाली १९९९ ला उत्पादन शुल्क विभागाच्या सेवेत मनोज संबोधी हा ‘कॉन्स्टेबल’ म्हणून रूजू झाला. मात्र सेवेतील काही वर्षातच तो विटा कार्यालयात हवालदार म्हणून पदोन्नतीवर काम करू लागला. खानापूर तालुक्यातील बिअर बार, परमिट रूम, देशी दारूची दुकाने, वाईन शॉप यासह ढाबे टार्गेट करीत संबोधी याचा वरिष्ठांच्या परस्परच ‘कारभार’ सुरू झाल्याने तो काही दिवसातच वादग्रस्त ठरला.परंतु, त्याचे गाव असलेल्या तालुक्यातील एका बड्या नेत्याने त्याच्या पाठीवर हात ठेवला. त्यामुळे ‘संबोधी’यास चांगलेच अभय मिळाले. काही महिन्यांतच संबोधी हा हवालदाराचा दुय्यम निरीक्षक झाला. पदोन्नतीनंतर तासगाव व पलूस हे दोन्ही तालुके संबोधी याच्या हातात आले. पण मुख्यालय विटा असल्याने संबोधी याने तासगाव, पलूससह मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अन्य तालुक्यातही आपला जम बसविण्याचा प्रयत्न सुरू केला.त्यातच विटा कार्यालयातील निरीक्षक इनामदार यांची सव्वा वर्षापूर्वी पदोन्नतीवर बदली झाल्याने विटा विभागातील निरीक्षक पद रिक्त झाले. मात्र राजकीय शक्ती वापरून संबोधी याने सव्वा वर्षापासून निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार हाती घेतला. विटा येथे रिक्त असलेले निरीक्षक पद भरण्यास संबोधी हाच मोठा अडसर असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला या पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळल्यानंतर तेथून पुढे लाचखोर संबोधी याने आटपाडी, कडेगाव, पलूस, तासगाव, खानापूर या पाच तालुक्यांचा ताबा घेऊन कार्यक्षेत्रातील परमिट रूम, बिअरबार, ढाबे, दारू दुकाने टार्गेट केले; पण सव्वा वर्ष विटा विभागात निरीक्षक पद रिक्त भरण्यासाठी अडसर ठरणारा संबोधी अखेर मंगळवारी आमणापूर येथे १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनोज संबोधी याच्या कॉन्स्टेबल ते दुय्यम निरीक्षकाच्या प्रवासाला बे्रक लागला.
लाचखोर ‘संबोधी’ला मिळाली शक्ती
By admin | Published: December 04, 2014 11:25 PM